Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे खासदार सुप्रिया सुळे मतदारसंघात फिरत असताना आगामी लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार याही मतदारसंघात गाठीभेटी घेताना दिसत आहेत. पवार कुटुंबीयांपासून दुरावले दौंडचे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुनेत्रा पवार यांनी आज (ता. १५ फेब्रुवारी) भेट घेतली, त्यामुळे सुनेत्राताईंनी प्रचाराला सुरुवात केल्याची चर्चा बारामतीत सुरू आहे. (Sunetra Pawar meet Rahul kul and family members)
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ बारामती आहे. कारण या मतदारसंघातून अजित पवार यांनी आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या पक्षाला आव्हान दिले आहे. बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांनी निर्वाणीचा भाषा वापरताना मी उभा केलेल्या उमेदवारालाच मते द्या, असे आवाहन केले होते, त्यामुळे बारामतीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती मतदासंघातून उमेदवारीसाठी सर्वाधिक चर्चेत सुनेत्रा पवार यांचे नाव आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल, असेही बोलले जात आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आज भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यातील राहू येथील निवासस्थानी भेट दिली. या वेळी आमदार कुल, यांच्यासोबतच माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल व संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी तब्बल तीन तास कुल कुटुंबाशी चर्चा केली. आजची भेट कौटुंबीक असल्याचे सांगण्यात आले असली तरी त्याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार ह्या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांच्या चुलत आत्या आहेत. राहुल कुल आणि कांचन कुल यांच्या विवाहासाठी सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घेतला होता. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी सुमारे १९ वर्षांपूर्वी कुल यांच्या राहू येथील निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर त्या आज कुल यांच्या घरी आल्या होत्या.
मागील लोकसभा निवडणुकीत कांचन कुल यांनी भाजपच्या तिकिटावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता या निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन व्यक्ती समोरासमोर उभ्या ठाकण्याची चिन्हे आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांनी राजकीय जुळणी करण्यास सुरवात केल्याचे मानले जात आहे.
खरं कुल कुटुंबीय हे पवारांचे निकटवर्तीय होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत पवारांपासून फारकत घेतली. त्यानंतर २०१९ ची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली. भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनीही मदत केल्याचे कुल सांगत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.