
Mumbai news : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील तीनही पक्षाच्या नेत्यांना वादग्रस्त विधाने करू नका, अशा सूचना केल्या होत्या. त्यासोबतच वादग्रस्त विधाने केल्याने राज्य सरकारची प्रतिमा मालिन होत आहे. त्यामुळे सरकारची बदनामी होईल, असे वर्तन टाळा, असे सांगितले होते. येत्या काळात असे प्रकार घडल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा दम त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मंत्र्यांना दिला होता.
दुसरीकडे विधिमंडळाच्या सभागृहात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले होते. मात्र, या कारवाईनंतरही मंत्रिमंडळातील मंत्री दत्तात्रय भरणे, संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर हे मंत्री बिनधास्तच दिसत असून त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे येत्या काळात राज्य सरकारसमोरील अडचणीत भरच पडणार आहे.
पावसाळी अधिवेशन काळापासून विविध कारनाम्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः महायुतीमधील सत्ताधारी पक्षाकडूनच राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रकार केला जात असल्याने या सर्व काही घटनामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळत आहे. त्यामुळेच राज्य सरकारसमोरील अडचणी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत.
दोन दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधाने व वर्तनानंतर त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी विनंती त्यांनी भाजपच्या हायकमांडची भेट घेऊन केली होती. त्यामुळे मंत्री शिरसाट, योगेश कदम या दोघांना क्लीन चिट मिळाली असल्याची चर्चा होती. त्या घटनेला दोन दिवस उलटले आहेत.
शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी वाद अंगावर ओढवून घेतला आहे. यापूर्वीही अधिवेशनावेळी शिरसाट यांना टार्गेट करण्यात आले होते. तर त्यांना ईडीकडून नोटिसही आली होती. त्याशिवाय मुंबईतील बंगल्यात पैसे असल्याची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली व विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलच्या लिलावात त्यांच्या मुलाने घेतलेल्या सहभागामुळे विरोधकांनी टीका केली आहे.
त्यातच शिरसाट यांनी वसतिगृहासाठी लागेल तेवढा निधी देतो. तुम्ही पाच, दहा, पंधरा कोटी रुपयांचा निधी मागितला तर निधी लगेच मंजूर करतो. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काही जात नाही, असे वादग्रस्त विधान मंत्री संजय शिरसाट यांने केले आहे. त्यामुळे शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
त्यातच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच वादग्रस्त विधान केले. कृषी खात्याचा भार घेतल्यानंतर दत्तात्रय भरणेंने महसूलच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना "वाकडं काम करून ते नियमात बसवा" असा सल्ला दिला. या विधानामुळे प्रशासनात गोंधळ झाला. सरळ काम सगळेच करतात; पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्या लोकांची कामे माणसे लक्षात ठेवतात, असे भरणे म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, शेतकऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
यानंतर भाजपच्या राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी देत असलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत त्या म्हणताना दिसत आहे की, 'असं कुणाचं काम केलं ना तर याद राख कानाखाली घालील, हा मेघना बोर्डीकरचा शब्द आहे. पगार कोण देतं? असली चमकोगिरी बिलकूल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकील.
त्याशिवाय मंत्री बोर्डीकर ग्रामसेवकाला खडसावताना म्हणाल्या की, 'चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राखा. काय काम करतो मला माहिती नाही का. मी मुद्दाम सीईओ मॅडमला येथे बोलावले आहे. हमली करायची ना तर सोडून दे नोकरी, असेही यावेळी मेघना बोर्डीकर म्हणाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या सर्व घटनामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे सभागृहात रमी खेळून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे दोन दिवसापूर्वीच खाते बदल केला असतानाच आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, दत्तात्रय भरणे व मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे आता सीएम फडणवीस येत्या काळात या वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंडळींवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.