
Mumbai news : राज्यातील पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा हा एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. गेल्या दहा वर्षात मात्र, या ठिकाणी मोठा बदल झाला आहे. कोल्हापूर, पुण्यात सुरुवातीला काँग्रेसचे तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून राजकारणाचा पॅटर्न बदलत चालला आहे. त्यामुळे आता पुण्यावर भाजपने वर्चस्व मिळवले आहे तर कोल्हापूर पूर्वी एकसंध शिवसेनेचा गड होता. मात्र आता पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेने बाजी मारली आहे. कोल्हापूर आणि पुण्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पडद्यामागे नेमके काय घडतय? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यामुळे येथील समीकरणे बदलणार आहेत.
गेल्या काही वर्षातील निवडणुकीचा इतिहास पहिला तर विदर्भ, कोकणाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हा भाजपचा (Bjp) बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे भाजपने खऱ्या अर्थाने या ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे. पुण्यात खासदार भाजपचा आहे तर आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघ जिंकत भाजपने बाजी मारली आहे. एवढेच नव्हे तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे आगमी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
कोल्हापूर, सांगली व सातारा या पट्ट्यात पूर्वी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, त्यानंतर काही काळ कोल्हापूर जिल्ह्यावर एकसंध शिवसेनेने बाजी मारली होती. मात्र, तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने याठिकाणी हातपाय पसरले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरची जागा गमावली असली तरी हातकणगलेची लोकसभा राखत विधानसभेला कोल्हापूर, सांगली व सातारा या पट्ट्यावर वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे शिंदे सेनेने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या गोटात तयारीला वेग आला आहे. महायुतीने आगामी काळात होत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याची घोषणा केलेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीची भूमिका देखील अद्याप ठरलेली नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी सहा महिने आधीच महाविकास आघाडीची बोलणी सुरु झाली होती. मात्र, या निवडणुकीत अद्याप आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढणं की स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यातच ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत एकत्रित जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा परिणाम महायुतीवर होणार आहे. त्यामुळे आघाडीतील मित्र पक्षाचे ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
त्यातच पुणे महापलिका निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरवात केली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचमुळे गेल्या काह दिवसापासून छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातील दौरे वाढवले आहेत. विशेषतः या ठिकाणी गेल्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवत भाजपने सत्ता आणली होती. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत भाजप या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोबत घेणार याची उत्सुकता लागली आहे.
गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्रित लढली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याने महायुतीमधील घटक पक्ष काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढते दौरे लक्षात घेता भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी सुरु केली असल्याची चर्चा आहे. मात्र, या विषयी गोपनीयता पाळण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे महायुती स्थानिकांच्या निवडणुकीसाठी काय निर्णय घेणार? याकडे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावर गट व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुतीमधील तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका व त्यादृष्टीने आखलेली रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याने महापालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग होण्याची शक्यता आहे. येत्या काळात पुण्यातील माजी आमदारासह काही माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच ही मंडळी भाजपमध्ये एंट्री करणार असल्याने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात सीएम फडणवीस कोणता डाव टाकणार अन् कोणाला चितपट करणार ? याकडे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, ठाणेनंतर कोल्हापुरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला मोठ्या प्रमाणात मतदाराने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिंदे यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. त्यामुळेच त्यांनी देखील कोल्हापुरला कार्यक्रमाच्या निमित्ताने येणे-जाणे सुरु ठेवले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापुरात पक्ष वाढविण्यासाठी सध्या तरी पुरेसा स्पेस दिसत आहे. त्यामुळेच शिंदे यांनी कोल्हापूरचे दौरे वाढवले आहेत. कोल्हापुर महापालिका व जिल्हयातील जिल्हा परिषद, पंचायात समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीची रणनीती ठरलेली नाही. त्यामुळे येत्या काळात भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेने मैदानात उतरून डाव टाकण्याची तयारी केली आहे. याठिकाणही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याने येत्या काळात मोठी राजकीय उलथापालाथ होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.