
Mumbai News : राज्यातील राजकारणात येत्या काळात उद्धव व राज ठाकरे बंधू एकत्रित येणार या चर्चेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मनसे व ठाकरेंची शिवसेना एकत्रित येण्याचा परिणाम होणार आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेलेले काही नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली असतानाच नांदेड येथील बंजारा समाजाच्या मेळाव्यात बोलताना जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मंत्र्यांने आपण उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची कबूलीच दिली आहे. त्यामुळे येत्या काळात संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षापूर्वी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली होती. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार गेले होते. या शिवसेनेतील फुटीचा मोठा परिणाम राज्यातील राजकारणावर झाला होता. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळेसपासून शिवसेनेतील या दोन गटात आडवा विस्तवही जात नाही.
या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठे यश मिळाले 9 खासदार निवडून आले तर दुरीकडे शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला या निवडणुकीत मोठे यश मिळाले. शिंदे गटाचे 54 आमदार निवडून आले तर ठाकरे गटाचे केवळ 20 आमदार निवडून आले. त्यानंतर गेल्या काही दिवसात ठाकरे गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग वाढले असतानाच आता पुन्हा एकदा उद्धव व राज ठाकरे बंधू एकत्रित येणार या चर्चेने राज्याचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
त्यातूनच आता मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या एकत्र येण्यावरून चर्चेला उधाण आले आहे. यावर शिंदे शिवसेनेतील काही नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटातील अनेक नेते, आमदार, मंत्री हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. जरी ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असले तरी त्यांनी ठाकरे यांच्या बरोबरचा संवाद त्यांनी तोडलेला नाही.
नांदेड येथील मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपण उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची कबूली दिली आहे. त्याचवेळी त्यांनी मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले गेले आहे. त्या प्रगतीपुस्तकात संजय राठोड नापास. पण मी कधी परीक्षा दिली नाही. कुणी पेपरही तपासले नाहीत. मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य संजय राठोड यांनी केले आहे.
त्याचवेळी राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत. मला उद्धव ठाकरे यांचे आजही फोन येतात. आमच्या दोघांमध्ये आजही संवाद आहे. आम्ही दोघे ही एकमेकांसोबत बोलतो असे संजय राठोड यांनी स्पष्ट केले. भरसभेत त्यांनी केलेल्या या वक्तव्यमुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. मात्र, त्यांनी या विधानावरून घुमजाव केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड हे मंत्री होते. त्यावेळी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांची बाजू लावून धरली होती. मात्र, त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी आक्रमक होत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये संजय राठोड मंत्री होते. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांची पुन्हा वर्णी लागली होती. त्यानंतर संजय राठोड यांनी केलेल्या या वक्तव्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले व आता शिंदे यांच्यासोबत काम करीत असलेलया माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांनी देखील एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतत त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली आहे. सध्याची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित बनल्याची खोचक टीका त्यांनी केली होती. अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत काम करीत आहे. पण आपल्याला कामाची संधी मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना आहे, असे वाटत होते, मात्र, सध्या तसे होताना दिसत नसल्याची टीका कीर्तिकर यांनी केली. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील खदखद या निमित्ताने बाहेर आली आहे.
काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुजाता शिंगाडे यांनी चार दिवसापूर्वीच ठाकरे यांच्या सेनेत घरवापसी केली. याचवेळी शिंगाडे यांनी शिंदे गटात जाणे ही माझी मोठी चूक होती, अशी मोठी कबुलीही दिली होती. शिंदेंच्या शिवसेनेत केवळ दिखावा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. माजी खासदार कीर्तिकर, सुजाता शिंगाडे यांनी केलेल्या विधानामुळे दुजोरा मिळत असतानाच आता मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे पडसाद आता येत्या काळात काय उमटतात? याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.