
India Pakistan tension 2025 News : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. काश्मीर येथे झालेल्या या अतिरेक्यांच्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. भारतावरील या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात रोष उसळला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानची जिरवण्यासाठी आता एखादी स्ट्राईक करणार की थेट एक घाव दोन तुकडे करणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
2016 सालच्या सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 सालच्या एअर स्ट्राईकची आठवण करून देणारी ही परिस्थिती, पुन्हा एकदा निर्णायक कारवाईचा इशारा देत आहे. येत्या काळात पाकिस्तानच्या कुरापतींना कायमस्वरूपी थोपवण्यासाठी केंद्र सरकारकडे काही प्रभावी आणि कठोर पर्याय समोर आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करताना काही बंधने घालत कारवाईचा फास आवळला आहे.
देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. हल्ला झाल्यानंतर लगेचच सैन्याने या परिसराचा ताबा घेऊन लागलीच सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. भारतावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर होते. त्यांनी हा दौरा अर्धवट सोडून लगेचच भारतात परतले असून त्यानंतर लगेचच बैठकांना सुरुवात केली. त्यामुळे सर्वानाच पीएम मोदींचे (Narendra Modi) पुढचे पाऊल कोणते असेल, याविषयी नेमकेपणाने सांगणे कठीण असले तरी, त्यांच्या पूर्वीच्या निर्णयप्रक्रियेकडे पाहता काही शक्यता पुढे येत आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा दावा भारताने केला आहे. भारताने कारवाईचा फास आवळताना पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे पाकिस्तानला आर्थिक नुकसान होत आहे. भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या शेती आणि पाणीपुरवठा व्यवस्थांवर परिणाम झाला आहे. भारत सरकारने अटारी सीमेला बंद केले आहे, ज्यामुळे पाकिस्तान आणि भारतादरम्यान होणारा व्यापार आणि प्रवासावर परिणाम झाला आहे.
सर्जिकल स्ट्राईक :
18 सप्टेंबर 2016 रोजी, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने उरी येथे 12 ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला, ज्यात 19 भारतीय सैनिक शहीद झाले होते. 29 सप्टेंबर 2016 रोजी, भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे जाऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सर्जिकल स्ट्राइक केला. या हल्ल्यात, भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या दहशतवादी लॉन्चपॅड्स आणि त्यांच्या तळांवर हल्ला करीत दहशतवादी तळे नाश केली होती. या हल्ल्यात त्यावेळी भारताने प्रतिशोधाची स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा स्वरूपाचा कारवाई होऊ शकते.
एअर स्ट्राईक :
2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये हवाई हल्ला (एअर स्ट्राईक) करण्यात आला होता. आठ दिवसातच भारताने पाकवर हल्ला केला होता. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट शहरावर केलेला हल्ला होता. हा हल्ला २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी करण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या 12 मिराज 2000 जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाउन बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. भारतीय सैन्यावर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आला होता.
भारतीय हवाई दलाने जैश-ए-महोम्मद या आतंकवादी गटाच्या बालाकोट येथील प्रशिक्षण शिबीरावर हल्ला केला आणि त्यात जवळपास 350 प्रशिक्षणार्थींना ठार केले होते. त्यामध्ये पाकचे मोठे नुकसान झाले होते. याद्वारे भारताने आक्रमक पद्धतीचे धोरण दर्शवत ही कारवाई करताना त्यामधून राजकीय संदेशही दिला होता. त्यामुळे येत्या काळात अशास्वरूपाची पुन्हा एकदा कारवाई केली जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबाव वाढवला :
भारत संयुक्त राष्ट्र, G20, BRICS यासारख्या मंचांवर पाकिस्तान किंवा अन्य संबंधित देशांवर दबाव टाकू शकतो. या साठी गेल्या काही दिवसापासून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. पाकिस्तानचा या हल्ल्यात थेट हात असल्याचे पुरावे हाती आल्यानंतर हे पुरावे सादर करून जागतिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न भारताचा असणार आहे. त्यामुळे आता युद्धपातळीवर पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
सायबर किंवा आर्थिक कारवाई :
पाकिस्तानसारख्या देशांवर आर्थिक निर्बंधांचा प्रस्ताव किंवा सायबर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणती कारवाई करायची याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार विनिमय सुरु आहे. त्यामुळे पाकची सायबर किंवा आर्थिक कोंडी करून मुसक्या आवळण्याचा भारताचा डाव असू शकतो.
देशांतर्गत सुरक्षेत वाढ :
पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने लगेचच कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. भारत-पाक सीमावृती भागात सैन्य वाढविण्यात आले आहे. त्या भागातील जनतेमध्ये जागरूक राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यासोबतच या भागात अंतर्गत गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे. एकंदरीत पाकच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
तीनही दलाची यंत्रणा सज्ज :
हल्ला झाल्यानंतर यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीनही सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नौदल, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच काही तरी मोठी कारवाई केली जाणार, असे संकेत या सर्व हालचाली पाहिल्यानंतर होत आहेत.
त्यामुळे येत्या काळात पीएम मोदींना पाकची आर्थिक आणि सर्वच पातळ्यांवर कोंडी करायची आहे. दहशतवाद्यांना मिळणारी विविध रसद बंद पाडायची, वेळप्रसंगी सर्जिकल स्ट्राईकचा मारा करायचा, अतिरेक्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत अशी मजबूत सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणा सज्ज ठेवायची, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला तोंडघशी पाडायचे, अशा विविध आघाड्यांवर आपल्याला एकाचवेळी काम करावे लागणार आहे. त्यामुळे पीएम मोदी येत्या काळात एखादी स्ट्राईक करणार की थेट एक घाव दोन तुकडे या पैकी कोणता निर्णय घेऊन पाकची कशी जिरवणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.