
Beed News : परळी विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याशी अरेरावी आणि त्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फड याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा व्हिडीओ मतदानाच्या दिवशीच व्हायरल झाला होता, मात्र गुन्हा अडीच महिन्यांनंतर दाखल झाला आहे.
साधारण अडीच महिन्यांपूर्वीचा मतदान केंद्रावरील प्रसंग आहे. तरुणांचे टोळके हुल्लडबाजी करत आहे, दादागिरी करत काही मतदारांना केंद्रात जाण्यासाठी रोखत आहे. विरोधी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याशी अरेरावी करत आहे, त्यांच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत आहे... हे चित्र आहे महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीतले. विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (dhananjay Munde) यांच्या परळी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर असा प्रकार घडला होता. असे सांगितले जाते की, असे प्रकार अनेक मतदान केंद्रांवर घडले होते, मात्र व्हिडीओ एकच व्हायरल झाला.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले त्या दिवशीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. असा प्रकार महाराष्ट्रातही घडू शकतो, हे पाहून लोकांना धक्का बसला होता. निवडणूक आयोग, पोलिस आणि प्रशासनाने त्यावेळी त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, हा त्यापेक्षा मोठा धक्का होता. आता अडीच महिन्यांनी याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कैलास फड हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी झाले. त्यांनंतर 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे (ता. केज, जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली. जनरेटा वाढल्यामुळे त्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर 'मकोका' लावण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या खुनाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपचे (Bjp) आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यामुळे कारवाई आणि पोलिसांचा तपासही पुढे सरकला.
मतदानाच्या दिवशी जो प्रकार मतदान केंद्रावर घडला, त्या प्रकरणात कैलास फड या गुंडावर गुन्हा दाखल करण्यासाठी अडीच महिने का लागले, याचे उत्तर निवडणूक आयोग, प्रशासन, पोलिस आणि तात्पर्याने सरकारला द्यावे लागणार आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ निवडणूक आयोगापर्यंत, पोलिसांपर्यंत पोहोचला नसेल, असे कसे म्हणता येईल? घटनास्थळावर पोलिस अधिकारी, कर्मचारी होते, हे त्या व्हिडीओत दिसत होते. पोलिसांच्या समोर हुल्लडबाजी झाली, विरोधी उमेदवाराला शिवीगाळ, कार्यकर्त्याला मारहाण झाली, तरीही गुन्हा दाखल का झाला नाही? सरकारकडे याचे काय उत्तर आहे?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजले नसते, आमदार आव्हाड आणि आमदार धस यांनी ते प्रकरण लावून धरले नसते तर काय झाले असते? उत्तर सोपे आहे, कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल झाला नसता, असे म्हणायला वाव आहे. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख रिंगणात उतरले होते. मतदानाच्या दिवशी त्या केंद्रावर धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फड हा पोलिसांच्या समोर देशमुख यांच्याशी हुज्जत घालत असल्याचे, त्यांच्याशी अरेरावी करत असल्याचे व्हिडीओत दिसत होते.
कैलास फड, त्याचा मुलगा निखिल फड याच्यासह 7 जणांनी राजेसाहेब देशमुख यांच्याशी अरेरावी केली होती, त्यांना शिवीगाळ केली होती. देशमुख हे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले होते. आम्ही कायद्याला जुमानत नाही, असा आविर्भाव फड बाप-लेक आणि कार्यकर्त्यांचा होता. देशमुख यांचे समर्थक अॅड. माधव जाधव यांना मतदान केंद्राबाहेर ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, ती कायदा-सुव्यवस्थेला शरमेने मान खाली घालायला लावणार होती. तरीही या गुंडांवर गुन्हा दाखल होण्यासाठी अडीच महिने लागले.
हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ याच कैलास फड याने महिनाभरापूर्वी व्हायरल केला होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकारण कोणत्या दिशेने गेले आहे, हे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उघडकीस येत असलेल्या परळीतील प्रकरणांवरून लक्षात येत आहे. अशा गुंड कार्यकर्त्यांची फौज बाळगणारे नेते ताठ मानेने समाजात फिरत असतात. त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश होत असतो. त्यातून मग अशा गुंडांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. परळीच्या उदरात आणखी काय काय दडले असेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.