Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्याची ओळख स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि सध्या शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे शहरांमध्ये स्थालांतर झाले. त्यातच आता मुंबईसारख्या महानगर क्षेत्रात होणारे राजकारण, त्यावर कोकणी माणसाचा पडणारा प्रभाव, मोठे प्रकल्प यामुळे सध्या या जिल्ह्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी भाजपने (Bjp) एंट्री केली आहे. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत शिंदेंना की ठाकरेंना? साथ देणार याची उत्सुकता लागली आहे. (Ratnagiri Assembly Election News)
गेल्या पाच वर्षांत राजकारणांत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. त्यामुळे या बदलत्या राजकारणाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यावर पडला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी भाजपने लक्ष घातले आहे. पक्ष बांधणीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्याने ते कॊणाच्या पाठीशी उभे राहणार? विधानसभेत कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार? शिवेसेनेत (Shivsena) पडलेल्या मोठ्या फुटीनंतर कोकणी माणसाची मिळणारी साथ ही शिंदेंना कि ठाकरेंना? शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कुणाचा वरचष्मा राहणार? याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण मतदाराच्या हातात सर्वच राजकीय पक्षांच्या नाड्या आहेत. त्यामुळे ग्रामीण मतदार काय करणार? तो कुणाच्या पारड्यात मत टाकणार? यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षीय बलाबल :
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. त्यामध्ये राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. रत्नागिरी - संगमेश्वरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर चिपळूण - संगमेश्वरमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत. गुहागरमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत तर खेड - दापोली - मंडणगडमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन तर महायुतीकडे तीन आमदार आहेत.
2024 च्या रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत काय झाले?
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊतांनी बाजी मारली होती. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विनायक राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहिली. उद्धव ठाकरेंनी निष्ठा राखणाऱ्या विनायक राऊतांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात असताना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा खेचून आणली. नारायण राणे यांनी पाहिल्यांदा निवडणूक लढविताना ही निवडणूक जिंकली. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीकडे चार तर दोन मतदारसंघ महाविकास आघाडीकडे होते. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आमदार
राजापूर - लांजा - साखरपा - राजन साळवी ( ठाकरे गट )
रत्नागिरी - संगमेश्वर - उदय सामंत ( शिंदे गट )
गुहागर - भास्कर जाधव ( ठाकरे गट )
खेड - दापोली - मंडणगड - योगेश कदम ( शिंदे गट )
चिपळूण - संगमेश्वर - शेखर निकम ( अजित पवार गट )
2019च्या निवडणुकीत काय झाले होते ?
रत्नागिरी - संगमेश्वर मतदारसंघ :
शिदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये उदय सामंता यांनी शिवसेनेकडून लढताना 1 लाख 58 हजार 514 मतांपैकी 1 लाख 18 हजार 484 मते घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला. मयेकर यांना 31 हजार 146 मते मिळाली होती. दरम्यान, 2019 मध्ये सामंत यांच्याविरोधात लढणाऱ्या मयेकर यांनी सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आत्तापर्यंत कामगिरीत सातत्य ठेवण्यात सामंतांना यश मिळाले आहे. 2004 , 2009 च्या दोन्ही निवडणुका सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्या. पण, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सामंत यांनी धनुष्यबाण हाती घेतला होता. सेनेतील बंडानंतर सामंत ऐनवेळी एकनाथ शिंदेंसोबत गेले. या निवडणुकीत तेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. जागा कॊणाच्या वाट्याला जाणार यानंतर उमेदवार ठरणार आहे. या मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा असणार आहे.
राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघ :
राजापूर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ? उद्धव ठाकरेंसोबत असलेले राजन साळवी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांना 65 हजार 433 मते मिळाली होती. त्यांना काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी चांगलीच टक्कर दिली होती. लाड यांना 53 हजार 557 मते मिळाली होती. साळवी 11 हजार 876 मतांनी विजयी झाले होते.
राजन साळवी यांनी हॅट्ट्रिक केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. जागा कॊणाच्या वाट्याला जाणार यानंतर उमेदवार ठरणार आहे.
गुहागर मतदारसंघ :
शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांचा हा मतदारसंघ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव यांना 78 हजार 748 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांना 52 हजार 297 मते मिळाली. या निवडणुकीत भास्कर जाधव विजयी झाले होते.
या निवडणुकीनंतर बेटकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. तर, महायुतीमध्ये भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही रंजक असणार आहे. जागा कोणाच्या वाट्याला जाणार यानंतर उमेदवार ठरणार आहे.
चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघ :
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांना 1 लाख 1 हजार 578 मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 71 हजार 654 मते मिळाली होती. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या शेखर निकम यांच्या राजकीय वर्चस्वाबाबत बोललं जाते. चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची विशेषता ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद मोठी आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर चिपळूण-संगमेश्वर या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. मुख्यबाब म्हणजे जागा कुणाला मिळणार? हे पाहावे लागणार आहे.
खेड - दापोली - मंडणगड मतदारसंघ :
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या योगेश कदम यांना 95 हजार 364 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांना 81 हजार 876 मते मिळाली होती. योगेश कदम 14 हजार मताने विजयी झाले होते. शिवसेनेतील फुटीनंतर आमदार योगेश कदम उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेले आहेत.
येत्या काळात याठिकाणी महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे योगेश कदम उमेदवार असणार आहेत तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी ठाकरे सेनेचा उमेदवार असणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.