Solapur,18 May : माढा विधानसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये 1303 मते कमी पडली आहेत. माढ्यात या वेळी दोन लाख 24 हजार 446 मतदान झाले असून 2019 मध्ये दोन लाख 25 हजार 749 मतदान झाले होते. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आरोग्य मंत्री तानाजी सावंत कसा पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) भाजपने तिकीट नाकारल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मोहिते पाटील यांनी उभारलेल्या आव्हानाचा सामना करताना माढ्यातील पारंपारिक राजकीय विरोधक सावंत आणि शिंदे कुटुंबीय एकत्र आले होते. भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांना दोन लाखांच्या मतांच्या फरकांनी निवडून आणू, असा दावा आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा तालुक्यातील वाकाव येथील सभेत बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी माढ्यातून निंबाळकर यांना मागील विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदे यांना पडलेली एक लाख 42 हजार 573, तर शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे यांना पडलेली 74 हजार 328 अशी एकूण दोन लाख 16 हजार 901 मते मिळतील, असा दावा केला होता. हा दावा करताना त्यांनी यात एक जरी मत कमी पडले, तर त्याला आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्या इतकेच शिवाजी सावंतही जबाबदार असतील, असे म्हटले होते.
मी जरी माळशिरसमध्ये गेलो नसलो तरी संपूर्ण राज्यातील नेत्यांची कुंडली माझ्याकडे असते. त्यामुळे कोणी कोठेही जाऊ द्या. माळशिरसमधून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना २५ हजार मतांचे लिड मिळेल, असा दावाही आरोग्य मंत्री सावंत यांनी केला आहे.
मोहिते पाटील यांच्या बंडामुळे माळशिरसमधून जी तूट निर्माण झाली, असे नेत्यांना वाटत आहे, ती तूट नसून आभासी तूट आहे, ती भरून काढण्यासाठी माढा तालुक्यातून निंबाळकर यांना दीड ते दोन लाख मतांचे लीड देण्याचे वचन आरोग्य मंत्री सावंत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर सभेत दिले आहे. ते वचन आता सावंत यांना पाळावे लागणार आहे. मात्र, त्या प्रमाणात माढ्यात मतदान झाल्याचे दिसून येत नाही.
वास्तविक, माढा विधानसभा मतदारसंघात 2024 मध्ये दोन लाख 24 हजार 446 मतदान झाले असून ते 66.48 टक्के आहे, तर 2019 मध्ये दोन लाख 25 हजार 749 मते मतदान झाले होते, ते 69.53 टक्के होते. म्हणजेच 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 1303 मध्ये कमी पडली आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये कमी मतदान झाले असताना सावंत यांनी जाहीर सभेत फडणवीसांना दिलेला शब्द कसा पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, माढ्यात दोन लाख 24 हजार 446 मतदान झाले आहे. म्हणजेच ज्या तानाजी सावंत यांनी निंबाळकर यांना दीड ते दोन लाख मताधिक्क्याचे वचन दिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मोहिते पाटील यांना जवळपास 75 हजार मतांमध्येच रोखून धरावे लागणार आहे. माढ्यातील तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि तुतारीचा बोलबोला पाहता सावंत यांना फडणवीसांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.