
Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात सध्या देशभर वातावरण तापले आहे. 4 दिवसांपूर्वीच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये सादरीकरण करीत आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला होता. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कथित 2 लोकांचा उल्लेख करत तापलेल्या राजकारणात आणखी तेल ओतले. या 2 लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकवून देण्याची गॅरंटी दिली होती, असे पवार म्हणाले. असाच दावा खासदार संजय राऊत यांनीही केला. उद्धव ठाकरे यांनाही असे दोघेजण भेटायला आल्याचे राऊतांना आठवले. पण दोघांनाही आपण त्या दोन लोकांचं काहीही ऐकलं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.
इथपर्यंत शरद पवार ( Sharad Pawar) आणि संजय राऊत या दोघांनाही आठवलं. पण ते दोघे कोण? त्यांची नावे काय? त्यांचे पत्ते काय? ते पवार आणि ठाकरे यांच्यापर्यंत कसे पोहचले? कडक सुरक्षा व्यवस्थेतूनही हे आतपर्यंत सहजासहजी कसे गेले? त्यांना घेऊन जाणारे नेते कोण? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. पण पवार यांनी अगदी सुरुवातीलाच त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत, असे म्हणत पुढील सर्वच प्रश्नांना पूर्णविराम दिला. राऊत यांनाही त्या दोघांची नावे आठवली नाहीत किंवा सांगितली नाहीत. यामुळे आता या दोघांचा शोध कसा घ्यावयाचा? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले होते, विधानसभा निवडणुका जाहीर होण्या आधी दिल्लीत 2 अनोळखी व्यक्तींनी भेटून 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती. त्यावेळी या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले, कारण निवडणूक आयोगाविषयी कोणतीही शंका नव्हती. नंतर त्यांची राहुल गांधींशीही भेट करवून दिली. पण त्यावेळी आम्ही दोघांनीही या प्रस्तावाला जाहीरपणे नकार दिला. निवडणुकीच्या माध्यमातून जनता देईल तोच निर्णय घेण्याचा आमचा निर्णय झाला, असे पवार यांनी सांगितले.
दुसरीकडे शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवारांच्या दाव्याला दुजोरा दिला. शिवाय उद्धव ठाकरे यांनाही भेटण्यासाठी असे दोन लोक आले होते, असा दावा केला. त्यांनी सांगितले की, “तेच दोन व्यक्ती” उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील पोहोचले होते. त्यांनी ईव्हीएममधून 60–65 “कठीण जागांवर” विजय सुनिश्चित करण्याची ऑफर दिली होती. सोबतच ईव्हीएममध्ये घोळ होणार, महाविकास आघाडीला कमी जागा मिळणार, असे भाकीत वर्तवले होते.
देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते काय म्हणाले?
एकंदरीतच या दोन्ही आरोपामुळे खळबळ उडाली आहे. दोघांचाही दावा निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य हस्तक्षेप किंवा गैरव्यवहार दाखवणारा गंभीर राजकीय आरोप आहे. मतदार आणि निवडणूक आयोग यांच्यातील विश्वासार्हतेला तडा घालवणारे हे आरोप आहेत. पण दोघांनाही नाव आठवू नये किंबहुना त्यांनी सांगू नये, हे आश्वर्यकारक आहे. एकीकडे शरद पवार यांना सभेत आरोळी देणाऱ्या, अनेक वर्षांनंतर भेटणाऱ्या व्यक्तींची नावे त्यांना आठवतात. मग चक्क विधानसभा निवडणूक जिंकून देण्याची ऑफर देणाऱ्यांची नाव पवारांना का आठवू नये? असा प्रश्न या निमित्ताने सर्वांनाच पडला आहे.
शरद पवार यांना दीड वर्षापूर्वी जुन्नर येथील एका कार्यक्रमावेळी सभेत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच्या नावासह ओळखले होते. घोषणेचा आवाज कानावर पडताच कोण कोंडाजी वाघ आहे का? असे म्हणत त्यांनी भरसभेत घोषणा देणाऱ्या व्यक्तीला ओळखले होते. मुंबईत कोणी भेटीला आले तर नावानिशी हाक मारत त्यांचे काम मार्गी लावण्याचे किस्से पवार यांनी जाहीर भाषणांमध्ये अनेकदा सांगितले आहेत. त्यामुळे ते ऑफर देणाऱ्या दोन व्यक्तीला ओळखत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार बाहेर पडले त्यांचा मुख्य आरोप होता ते म्हणजे उद्धव ठाकरे भेटत नाहीत. म्हणजे पक्षाच्या आमदारांना नेता भेटणे अवघड जाते तिथे असेच दोन लोक येऊन भेट घेऊन जातात, त्यावर त्यांची नावे आठवत नाहीत किंवा सांगितली जात नाहीत या गोष्टी समजण्यापलिकडील आहेत. पण भविष्यात कधी तरी दोघांनाही त्या दोघांची नावे आठवतील एवढीच अपेक्षा ठेवू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.