Maulana Azad News : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. अशा नेत्यांमध्ये काँग्रेसचे मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नावही आघाडीवर आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रचंड बुद्धिमत्ता आणि क्रांतिकारी कार्याचं दुर्मीळ असं रसायन होतं. धर्मशास्त्रात पारंगत असलेल्या मौलाना आझाद यांनी विज्ञान, तत्वज्ञान, गणित आणि तर्कशास्त्रही आत्मसात केलं. पत्रकारिता आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला अमिट असा ठसा उमटवला. देशाला ब्रिटिशांच्या हुकूमशाहीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याची साद घातली. 'अल-हिलाल' या त्यांच्या नियतकालिकातून त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात रान पेटवलं.
1857 चा उठाव अयशस्वी झाल्यामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये निराशेचं मळभ दाटलं होतं, त्यांनी आत्मविश्वास गमावला होता. राज्यकर्त्यांशी जवळीक साधून काही मुस्लिम नेत्यांनी हा आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मौलाना आझाद यांच्यासाठी ही बाब देशविरोधी आणि इस्लामविरोधीही होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणं हेच मुस्लिमांच्या दीर्घकालीन हिताचं ठरेल, याची जाणीव मौलाना आझाद यांना झाली होती. 'अल-हिलाल'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याची साद घालत असतानाच त्यांना मुस्लिमांचंही प्रबोधन केलं. त्यावेळी भारतीय मुस्लिमांसाठी ही एक धाडसी, नावीन्यपूर्ण विचारसरणी होती. त्यामुळं मुस्लिम जगतात खल सुरू झाला होता. अखेर मौलाना आझाद (Moulana Azhad) यांच्या प्रयत्नांना यश मिळालं होतं.
असे सांगितले जाते, की मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबत सरोजिनी नायडू यांनी एक विधान केलं होतं. मौलाना आझाद यांची विद्वत्ता समजून घेण्यासाठी ते विधान काय आहे, हे सर्वांना माहित असलं पाहिजे. मौलाना आझाद यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच खूप नाव कमावलं होतं. त्यावर सरोजिनी नायडू म्हणाला होत्या, ''आझाद ज्या दिवशी जन्मले, त्याच दिवशी त्यांचं वय 50 वर्षं झालं होतं.'' सरोजिनी नायडू असं का म्हणाल्या होत्या, हे आता आपल्या लक्षात आलं असेल. ते 'आझाद' या नावानं लेख लिहायचे. त्यामुळं त्यांना आझाद हे टोपणनाव मिळालं होतं.
देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबियातील मक्का या इस्लामधर्मीयांच्या पवित्र शहरात झाला. त्यांचं खरं नाव अबुल कलाम गुलाम मोहियुद्दीन अहेमद असं होतं. त्यांचे वडील मौलाना सय्यद मुहम्मद खैरुद्दीन बिन अहेमद हे त्यांना फिरोज बख्त या नावानं हाक मारायचे. अबुल कलाम आझाद यांच्या मातुःश्री आलिया या मक्का येथीस रहिवासी. त्यांचं कुटुंब सुसंस्कृत, सुशिक्षित होतं. आझाद यांचे आजोबा, म्हणजे त्यांच्या मातुश्रींचे वडील हे एक प्रतिष्ठित, विद्वान होते.
1857 च्या उठावाच्या आधी मौलाना आझाद यांचे वडील खैरुद्दीन हे सौदी अरेबियाला गेले होते. तेथे त्यांनी 30 वर्षं वास्तव्य केलं. ते अरबी भाषेचे जाणकार होते. इस्लामी धर्मग्रंथांचे ते विद्वान बनले. त्यांनी अरबी भाषेत एक पुस्तकही लिहिले. खैरुद्दीन हे 1895 मध्ये कुटुंबीयांसह भारतात परतले आणि कोलकाता येथे स्थायिक झाले. मौलाना आझाद शाळा किंवा मदरशात गेले नाहीत. त्यांचं सर्व शिक्षण घरीच झालं होतं. वडिल हेच त्यांचे पहिले शिक्षक.
लहानपणापासूनच त्यांना भाषणाची आवड होती. असं सांगितलं जातं, की एखाद्या व्यासपीठावर उभं राहून ते भाषण करायचे आणि आपल्या भावंडांना आजूबाजूला उभं राहून टाळ्या वाजवायला सांगायचे. त्यांना अरबी, पारसी आणि उर्दू भाषांची आवड होती. इस्लामी शिक्षणासह विज्ञान आणि तत्त्वज्ञानासारख्या आधुनिक विषयांतही ते पारंगत झाले. यामुळेच त्यांचा दृष्टीकोण व्यापक बनला. प्रारंभिक शिक्षण घरीच घेतलेले मौलाना आझाद उच्च शिक्षणासाठी इजिप्तला गेले. तेथील जामिया अझहर या शिक्षण संस्थेत त्यांनी प्राच्यविद्येचं शिक्षण पूर्ण केले. सौदी अरेबियातून भारतात परतल्यानंतर कोलकाता ही त्यांची कर्मभूमी बनली. तेथूनच त्यांनी पत्रकारिता आणि राजकारणाचा प्रारंभ केला.
मौलाना आझाद यांनी कोलकाता येथून जून 1912 मध्ये 'अल हिलाल' नावाचं नियतकालिक सुरू केलं. राजकारणावर आधारित हे पहिलंच सचित्र नियतकालिक ठरलं. या नितयकालिकाचा खप 52 हजार प्रतींपर्यंत गेला होता. या माध्यमातून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. लोकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याची ज्योत तेवत राहिल, याची काळजी घेतली. ब्रिटिशांच्या धोरणांवर घणाघाती टीका करताना लोक स्वातंत्र्यसंग्रमाशी जोडले जातील, याची काळजी त्यांनी घेतली.
अबुल कलाम आझाद यांनी ब्रिटिशांच्या धोरणांविरुद्ध टीका सुरू केली होती. त्यामुळे ब्रिटीश सरकारनं दोन वर्षांत म्हणजे 1914 मध्ये 'अल-हिलाल'वर बंदी घातली. त्यानंतरही आझाद शांत बसले नाहीत. त्यांनी 'अल-बलाग' नावानं दुसरे नियतकालिक छापायला सुरुवात केली. त्यातही ब्रिटिशांच्या धोरणांवर कडाडून टीका केली जात असे. हिंदू-मुस्लिम एकतेसाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय भावना चेतवण्याचा प्रयत्न केला. पैगाम, लिसान उल सिद्दक या पत्रिकाही त्यांनी प्रकाशित केल्या.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ब्रिटिशांच्या विरोधात पत्रकारितेच्या माध्यमातूनच नव्हे, तर जमिनीवर उतरूनही संघर्ष केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन आणि खिलाफत चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्यांचा काँग्रेसशी (Congress) संबंध आला. पुढे ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले. महात्मा गांधीजी, डॉ. मुख्तार अहेमद अन्सारी, हकीम अजमल खाँ आणि अली बंधूंसोबत त्यांचे निकटचे संबंध होते. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. गांधींजींचे विचार आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते देशभरात फिरले. एक महत्वाचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांचा उदय झाला.
स्वातंत्र्यासाठी लढा सुरू असताना मौलाना अबुल कलाम आझाद यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. अशा प्रसंगांत त्यांच्या पत्नी जुलेखा बेगम यांनी त्यांना भक्कम साथ दिली. जुलेखा बेगम याही स्वातंत्र्याच्या संग्रामात पतीच्या बरोबरीने लढल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांच्यावर शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी देशासाठी भरी योगदान दिलं. विद्यापीठ आनुदान आयोग आणि अन्य तांत्रिक, सांस्कृतिक संस्थांची स्थापना त्यांच्याच कार्यकाळात झालेली आहे.
मौलाना आझाद हे 1947 ते 1958 पर्यंत देशाचे शिक्षणमंत्री होती. या कालावधीत त्यांनी शिक्षणव्यवस्था सुदृढ करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगासह आयआयटी, आयआयएससी, जामिया मिलिया इस्लामिया आदी महत्वाच्या संस्थांची उभारणी त्यांच्याच शिक्षणमंत्रिपदाच्या काळात झाली. या संस्था आजही उच्च शिक्षणात मैलाच्या दगड समजल्या जातात. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, असे त्यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यावर भर दिला होता. तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षणावरही त्यांचा भर होता.
मौलाना आझाद हे केवळ राजकारणाची नव्हे तर उत्कष्ट पत्रकार, साहित्यिक आणि समीक्षकही होते. त्यांनी शायरीही लिहिली. निबंध, विज्ञानाशी संबंधित अनेक लेखही त्यांनी लिहिले आहेत. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्यामुळं ब्रिटिशांनी त्यांनी अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर येथील किल्ल्यात त्यांना कैदेत ठेवलं होतं. त्यादरम्यान त्यांनी 'गुबार ए खातिर' हे पुस्तक लिहिलं. मौलाना हबीबुर्रहमान खाँ शेरवानी यांच्या नावे लिहिलेल्या सर्व पत्रांचा त्यात समावेश आहे. साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक संशोधक मालिक राम यांनी संपादित केलं आहे. मौलाना आझाद यांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचं समजलं जातं. याशिवाय 'तज्किरा', 'तर्जुमान-उल-कुरआन' आदी पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत.
स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्तानं मौलामा आझाद यांची महात्मा गांधी यांच्याशी जवळीक निर्माण झाली. सविनय कायदेभंगासह गांधीजींनी पुकारलेल्या विविध आदोलनांत, सत्याग्रहांत मौलाना आझाद सहभागी झाले. मिठावरील कराच्या विरोधात गांधीजींनी मार्च 1930 मध्ये काढलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलनातही ते सहभागी झाले. आंदोलनांत सहभागामुळं मौलाना आझाद यांना 1920 ते 1945 दरम्यान अनेकवेळा तुरुंगात जावं लागलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात आझाद हे 1923 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर 1940 ते 1946 दरम्यानही ते काँग्रेसचे अध्यक्ष होते.
भारत-पाकिस्तान फाळणीला मौलाना आझाद यांचा अखेरपर्यंत विरोध कायम होता. हिंदू आणि मुस्लिमांना सामावून घेणारा भारत अस्तित्वात यावा, तो कायम राहावा, यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मुहम्मद अली जिना यांच्या धोरणांना त्यांनी विरोध केला. फाळणीनंतर दंगली सुरू झाल्या. त्यावेळी मौलाना आझाद यांनी दिल्लीतील जामा मशिदीतूनन मुस्लिमांना शांतता राखण्याचं, भारतात राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यांचं हे भाषण ऐतिहासिक ठरलं. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठीच्या सभेवर त्यांची निवड झाली होती.
मौलाना आझाद हे राष्ट्रवादी नेते होते. वैयक्तिक जीवनात ते एक समर्पित मुस्लिम होते, मात्र खिलाफत चळवळ वगळता सार्वजनिक जीवनात त्यांनी कधीही आपल्या धर्माचं प्रदर्शन केलं नाही. डॉ. एम. एम. अन्सारी, हकीम अजमल खाँ, खान अब्दुल गफ्फार खान आणि हसरत मोहानी यांच्याप्रमाणेच मोलाना आझाद यांनाही मुस्लिमांचे नेते, असं म्हणवून घेणं आवडत नव्हतं. महात्मा गांधीजींशी त्यांची पहिली भेट 18 जानेवारी 1920 रोजी झाली. खिलाफत चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी झाले.
मौलाना आझाद दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष बनले, त्यावेळी जिना यांच्या वेगळ्या मुस्लिम राष्ट्राच्या निर्मितीच्या मागणीचा जोर वाढला होता. जिना यांची समजूत काढण्याची जबाबदारी आझाद यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र जिना हे आझाद यांना भेटू इच्छित नव्हते. ''मी तुमच्यासोबत बोलूही इच्छित नाही आणि पत्रव्यवहारही करू इच्छित नाही'', असं जिना यांनी पत्र लिहून आझाद यांना कळवलं होतं. ''तुम्ही भारतीय मुस्लिमांचा विश्वास गमावला आहे. काँग्रेसनं केवळ दिखावा म्हणून तु्म्हाला अध्यक्ष बनवलं आहे, याची कल्पना आहे का? तुम्ही ना मुसलमानांचे प्रतिनिधित्व करता ना हिंदूंचे. तुमच्यात थोडाही आत्मसन्मान असेल तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या,'' असंही जिना त्या पत्रात म्हणाले होते.
आझाद यांनी जिना यांच्या या पत्राचं थेट उत्तर दिलं नव्हतं, मात्र त्यांनी प्रतिवाद केला होता. "हिंदू आणि मुस्लिम या दोन भिन्न संस्कृती आहेत. त्यांचे धर्मग्रंथ, नायक वेगवेगळे आहेत. एका समुदायाचे नायक दुसऱ्या समुदायाचे खलनायक म्हणून नेहमीच उभे राहतात,'' असं ते म्हणाले होते. मौलाना आझाद यांनी शंभर वर्षांपूर्वीच हिंदू-मुस्लिमांना एकत्र येण्याची संधी दिली होती. ज्यांना शांतात, सौहार्द हवा आहे, त्या सर्वांनी या दोन धर्मांत समानतेसाठी जोर द्यायला हवा, असं त्यांना वाटत होतं.
मौलाना आझाद यांनी फाळणीला अखेरपर्यंत विरोध केला. त्यांनी तसं महात्मा गांधी यांच्याजवळ बोलून दाखवलं होतं. मात्र 1947 संपता संपता फाळणीसाठी सरदार वल्लभभाई पटेलही तयार झाले होते. पंडित नेहरू यांनीही फाळणीचं सत्य स्वीकारलं होतं. आझाद यांचाही नाईलाज झाला होता. आझाद यांचे कट्टर टीकाकार असलेले आचार्य कृपलानी यांनी मात्र त्यांच्या पुस्तकात वेगळंच लिहिलं आहे. ते म्हणतात, ''आझाद यांनी 'इंडिया विन्स फ्रीडम' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, फाळणीच्या विरोधातील माझं मत मी गांधीजींच्या समोर स्पष्टपणे मांडलं आहे. त्यांच्या आणि गांधीजींच्या या खासगी बैठका कधी झाल्या, याची मला माहिती नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या किंवा पक्षाच्या एकाही बैठकीत आझाद यांनी फाळणीला विरोध केल्याचं मला आठवत नाही. ''
स्वातंत्र्यानंतरही भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांना आझाद यांनी सावध केलं होतं, त्यांना न जाण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही मातृभूमी सोडून जात आहात. याचा परिणाम काय होईल, याची कल्पना तुम्हाला नाही. तुम्ही जात आहात त्यामुळे भारतातील मुस्लिमांची बाजू कमकुवत होईल, असे ते उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना म्हणाले होते. आझाद यांना आरोग्याच्या समस्यांचा नेहमीच सामना करावा लागला.
19 फेब्रुवारी 1958 रोजी ते बाथरूममध्ये पडले. त्यांच्या कमरेचं हाड तुटलं. त्यांना पाहण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आले. त्यांना पाहताच ते म्हणाले होते, ''खुदा हाफीज, जवाहर.'' 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांना 1992 मध्ये मरणोत्तर 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.