Dharashiv political history : धाराशिवच्या लाल मातीनं राजकारणातील अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. पण पवन राजेनिंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील 'दोस्ती-दुश्मनी'च्या कहाणीनं जिल्ह्याच्या सत्तेचा भूगोलच बदलून टाकला. एकेकाळी जिल्ह्यावर एकहाती हुकूमत गाजवणारी ही जोडगोळी 'तेरणा' कारखाना आणि राजकीय महत्त्वाकांक्षेच्या वादात अडकली. या वादाचा शेवटही प्रचंड भयंकर होता. या शेवटाला आता दोन दशकं पूर्ण होत आहेत, मात्र न्यायालयीन लढाई आजही सुरूच आहे.
ही फक्त दोन नेत्यांची गोष्ट नाही… ही आहे सत्तेची, नात्यांची आणि विश्वासघाताची एक थरारक कहाणी. सरकारनामाच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये आज आपण धाराशिवच्या राजकारणातील याच धगधगत्या संघर्षाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत... डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवन राजेनिंबाळकर हे एकमेकांचे चुलत भाऊ होते. धाराशिव जिल्ह्यातील राजेनिंबाळकर आणि पाटील घराण्यातील हे कौटुंबिक ऋणानुबंध अनेक पिढ्यांचे होते. संताजी आणि बाजीराव हे दोघं सख्खे भाऊ. बाजीराव यांना तेरच्या संस्थानिक पाटलांनी दत्तक घेतले. तर संताजी हे गोवर्धनवाडी इथं स्थायिक झाले. याच बाजीराव यांचे पुत्र पद्मसिंह पाटील आणि संताजी यांचे पुत्र पवन राजेनिंबाळकर.
राजकारणात येण्यापूर्वी आणि सुरुवातीच्या काळात या भावांमध्ये कमालीचं सख्य होतं. नातं केवळ रक्तांचं नव्हतं तर विश्वासाचंही होतं. दोघेजण फक्त चुलत भाऊच नव्हते तर त्यांच्यात सोयरेधायरे संबंधही होते. ही दोन्ही घराणी धाराशिवमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराणी असल्याने त्यांचे नातेसंबंध जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले होते. त्यांच्या या एकत्र शक्तीमुळेच त्यांना 'अभेद्य' मानलं जात होतं. जिल्ह्यात एकच चर्चा असायची ती म्हणजे "हे दोघे असताना त्यांना कोणीच तोड नाही!"
पवन राजेनिंबाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही प्रामुख्यानं सहकार क्षेत्रातून झाली. तिथूनच त्यांनी तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण केलं. जिल्ह्यातील सहकारी संस्था, दूध संघ आणि साखर कारखान्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा पवन राजेनिंबाळकर राजकीय प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. जिल्हा बँकेवर त्यांची मजबूत पकड होती. बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिलं.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायानं राजकारणावर नियंत्रण मिळवलं. तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं विणलं. त्याचा मोठा फायदा त्यांना त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत झाला. त्यानंतरच्या काळात पवन राजेनिंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील 'तेरणा' साखर कारखान्यात सक्रिय झाले. सहकार चळवळीत काम करत असताना त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांवर काम करायला सुरुवात केली. जागजी गटातून जिल्हा परिषदेवरही निवडून गेले.
धाराशिव जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेला 'तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना' आणि पवन राजेनिंबाळकर यांची कारकीर्द यांचं अतूट नातं होतं. या कारखान्यामुळेच त्यांची राजकीय उंची वाढली, पण याच कारखान्यामुळं त्यांच्या आयुष्यात मोठे कायदेशीर आणि राजकीय वादही निर्माण झाले. पवन राजेनिंबाळकर यांनी तेरणा कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं संघटन उभं केलं. कारखान्याचे चेअरमन आणि संचालक म्हणून त्यांनी हजारो ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांशी थेट संपर्क निर्माण केला.
एका बाजूला पवन राजेनिंबाळकर जिल्ह्याचं सत्ताकेंद्र हातात घेत होते. तर दुसऱ्या बाजूला पद्मसिंह पाटील राज्याच्या राजकारणात एक एक पायरी वर जात होते. राज्याचे गृहमंत्री झाले, शरद पवारांचे सर्वात विश्वासू म्हणून ओळख निर्माण झाली. पवन राजेनिंबाळकर यांनी धाराशिव जिल्हा बघायचा आणि पद्मसिंह पाटील यांनी राज्याचं राजकारण करायचा असा अलिखित करारच दोघांमध्ये झाला होता. या जोडीला जिल्ह्यात आव्हान देणं विरोधकांसाठी जवळपास अशक्य मानलं जायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा निवडणुकांपर्यंत या दोघांचाच शब्द अंतिम होता.
पण इतिहास सांगतो… जिथे सत्ता असते, तिथे संघर्ष जन्माला येतो. ज्या सहकार क्षेत्रातून दोघांचा एकत्र प्रवास सुरू झाला होता, तिथल्याच वर्चस्वावरून आणि राजकीय महत्वाकांक्षेवरून त्यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले. या मतभेदांचं रूपांतर नंतर अशा संघर्षात झाले ज्यानं महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून टाकलं. धाराशिवच्या राजकारणाकडे आज पाहतो तेव्हा या दोन कुटुंबांमधील संघर्ष हा केवळ राजकीय उरला नसून तो एक 'प्रतिष्ठेचा लढा' बनला आहे, ज्याची बीजं या सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर आलेल्या दुराव्यात आहेत.
नवीन शतकात पवन राजेनिंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये खटके उडू लागले. पद्मसिंह पाटलांनी आपल्याच सर्वात विश्वासू भावाचे पंख कापायला सुरुवात केली. तेरणा कारखाना आणि जिल्हा बँक ही पवन राजेंनिंबळकांची ताकद होती. याच जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचं प्रकरण बाहेर आलं. कोर्टानं पवन राजेनिंबाळकर यांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यावेळी ते दोन महिने फरार राहिले आणि पुढे अटकही झाली. पण याच प्रकरणात पद्मसिंह पाटलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं असा आरोप पवन राजेनिंबाळकरांनी केला.
जिल्हा बँकेचं प्रकरण सुरू असतानाच तेरणा कारखान्यावर चौफेर आरोप होऊ लागले. कारगिल निधी भ्रष्टाचार, ऊस विकास बचत, पूरग्रस्त निधींमध्ये घोटाळ्याचे आरोप झाले. 29 कोटी रूपयांच्या साखर निर्यात घोटाळ्याच्या आरोपांनंतर सर्वात मोठा स्फोट झाला. पद्मसिंह पाटलांना पाटबंधारे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. इथूनच पाटील यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. तेरणा कारखाना जो एकेकाळी त्यांना जोडत होता, तोच आता त्यांना तोडत होता.
पवन राजेनिंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष इतका टोकाला गेला होता की, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले. 2004 मधील उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात गाजलेली निवडणूक ठरली. ही केवळ निवडणूक नव्हती… ते सत्तेचं ‘महायुद्ध’ होतं. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, तर पवन राजेनिंबाळकर यांनी त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याने तगडे आव्हान दिलं होतं.
अनेक वर्षे ज्यांनी एकमेकांना साथ दिली होती, त्यांच्यातील ही लढत अत्यंत अटीतटीची झाली. पद्मसिंह पाटील यांनी ही निवडणूक जिंकली खरी, पण पवन राजेनिंबाळकरांनी त्यांना शेवटपर्यंत झुंजवलं. विजयाचे अंतर केवळ 484 मतांचे होते, जे पद्मसिंह पाटलांच्या राजकीय वजनाच्या तुलनेत अगदीच नगण्य होते. दोघांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला. पवन राजेनिंबाळकरांनी पद्मसिंह पाटलांच्या राजकीय साम्राज्याला पाडलेले हे मोठे खिंडार होते.
2006 मध्ये या संघर्षाने एक काळंकुट्ट वळण घेतलं. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईजवळ पवन राजेनिंबाळकर यांची हत्या झाली. या हत्येचा आरोप डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. सीबीआयने हत्या प्रकरणात पाटील यांनाच मुख्य सूत्रधार मानलं होतं. 2009 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. एकेकाळचा भाऊ आता आरोपाीच्या पिंजऱ्यात उभा होता. पाटील यांच्यासोबतच शूटर आणि इतर मध्यस्थांनाही आरोपी करण्यात आलं. या घटनेला जवळपास 20 वर्ष पूर्ण होत असताना याबाबतचा निकाल अद्याप लागलेला नाही.
या दरम्यानच्या काळात 'पाटील विरुद्ध राजेनिंबाळकर' यांच्यातील शत्रुत्वानंही टोक गाठलं. पवन राजेनिंबाळकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव ओमप्रकाश राजेनिंबाळकर राजकारणात आले, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना राजकीय आशीर्वाद दिला. तिकडं डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांनीही राजकारणात उडी घेतली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ओम राजेनिंबाळकर यांनी राणाजगजितसिंह यांचा पराभव करून वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. त्याचवर्षी विधानसभेला ओम राजेनिंबाळकर यांना पराभूत करत राणाजगजितसिंह पाटील यांनी वचपा काढला. 2019 मध्ये पु्न्हा ओम राजेनिंबाळकर यांनी लोकसभेला राणाजगजितसिंह पाटील यांचा 1 लाख 27 हजार मतांनी पराभव केला. तर 2024 मध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा 3 लाख 29 हजार मतांनी पराभव केला.
निवडणुकीशिवाय देखील अनेकदा ओम राजेनिंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील वैर जाहीरपणे बैठकांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून येते. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पवन राजेनिंबाळकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कारखान्याच्या मुद्द्यावरून अनेकदा राजकीय भूमिका घेतली आहे. आजही धाराशिवच्या राजकारणात "तेरणा कारखाना कोणाकडे?" किंवा "कारखान्याची दुरवस्था कोणामुळे झाली?" यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतात.
तेरणा कारखाना पवन राजेनिंबाळकर यांच्यासाठी एका बाजूला लोकप्रियतेचं साधन ठरला, तर दुसऱ्या बाजूला याच कारखान्यातील वादातून त्यांच्या आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय शत्रूत्व टोकाला पोहोचलं. याचा परिणाम पुढे जिल्ह्याच्या संपूर्ण राजकीय इतिहासावर झाला. पण महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त राजकीय खून आणि त्यामागची कहाणी आजही पूर्णपणे उलगडलेली नाही. दोस्ती… सत्ता… विश्वासघात… आणि खूनाची ही कहाणी आजही कोर्टात आणि जिल्ह्यातील राजकारणात जिवंत आहे हे नक्की…
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.