Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : विधानसभेला आयात केलेले अन् पक्षाने निष्ठावंत म्हणून उमेदवारी दिलेले सगळेच पळाले! उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात फटका..

Imported members and loyalists part ways with Uddhav Thackeray, causing a significant setback for Shiv Sena in the Marathwada region. : मराठवाड्यात पक्ष फुटीनंतर संकटात सापडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अजूनही गद्दारी आणि विश्वासघाताचे धक्के बसतच आहेत.

Jagdish Pansare

Marathwada Political News : तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड पुकारात शिवसेना फोडली. निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा संघर्ष दरम्यानच्या काळात पाहायला मिळाला. पक्ष फुटी नंतरच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने लवचिक भूमिका ठेवत काही उमेदवार इतर पक्षातून आयात केले. तर काही मतदारसंघात निष्ठावंतांना न्याय दिला.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारविरोधात असलेला रोष मतपेटीतून बाहेर पडला आणि महाविकास आघाडीचे नशीब फळफळले. मात्र विधानसभेला महायुतीने सावध पावले टाकत लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती टाळली. 232 हून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राची सत्ता महायुतीने काबीज केली. लोकसभेत मिळालेले यश महाविकास आघाडीला विधानसभेत टिकवता आले नाही, याचा फटका महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक बसला.

गेल्या काही महिन्यात मराठवाड्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागल्याचे दिसून येते. यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि काही प्रमाणात परभणी जिल्ह्यात आयात केलेले आणि पक्षातील निष्ठावंत म्हणून ज्यांना विधानसभेची संधी दिली अशा सगळ्यांनीच पक्षातून काढता पाय घेतला. मराठवाड्याची राजधानी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वाधिक नुकसान झाले.

सत्तेकडे ओढा..

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत सहा आमदार निवडून आणत दणदणीत विजय मिळवला. एक खासदार आणि सहा आमदार हाताशी असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आणि मराठवाड्यातही एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारी ठरली. शिवाय सत्तेत उपमुख्यमंत्री पद आणि विविध खात्याची मंत्रिपद असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक माजी महापौर, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भुरळ पडली.

शिवसेनेने ज्यांना ज्यांना महापौर, मंत्री केले ते सगळे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दिसतात. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याच्या नावाखाली भाजपमधून आयात केलेल्या पण विजय न मिळू शकलेल्या बहुतांश पराभूत उमेदवारांनी पुन्हा आपल्या जुन्या पक्षात घरवापसी करत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का दिला. यात प्रामुख्याने शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आग्रहावरुन पक्षप्रवेश आणि त्यानंतर विधानसभेची उमेदवारी मिळालेल्या तिघांचा समावेश आहे.

यात सिल्लोडमध्ये शिवसेनेचे तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लढलेले सुरेश बनकर, वैजापूरमध्ये विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांच्याविरोधात उमेदवार असलेले दिनेशसिंह परदेशी आणि नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजू शिंदे यांचा समावेश आहे. या तीनही भाजप मधून आयात केलेल्या उमेदवारांनी आता घरवापसी केली आहे. पैकी सुरेश बनकर, दिनेश परदेशी यांचा भाजपाने स्वीकार केला आहे. तर राजू शिंदे यांचा प्रवेश अद्याप निश्चित झालेला नाही.

वैजापूरमध्ये निर्णय चुकला..

वैजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन वर्षापूर्वी प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनाही उमेदवारी नाकारून भाजपमधून आलेल्या दिनेश परदेशी यांच्यासाठी पायघड्या घालण्यात आल्या. पराभवानंतर हेच परदेशी आता पुन्हा भाजपवासी झाले आहेत. हीच परिस्थिती सिल्लोडच्या सुरेश बनकर यांचीही आहे. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उमेदवारी देत उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडमध्ये सभाही घेतली होती.

सुरेश बनकर यांनी सत्तार यांना जेरीस आणून चांगलाच घाम फोडला. मात्र अवघ्या 2420 मतांनी बनकर यांचा पराभव झाला. पराभवानंतर दोन महिन्यातच सुरेश बनकर भाजपमध्ये परतले. त्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यात मोठी संघटनात्मक नुकसानही झाले. विशेष म्हणजे बनकर, परदेशी आणि राजू शिंदे यांना शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून पक्षात आणले होते. विधानसभेची उमेदवारीही मिळवून दिली. मात्र पराभवानंतर यातील एकही उमेदवार पक्षासोबत कायम राहिला नाही.

परभणी, धाराशिवमध्ये पक्ष टिकला..

एकीकडे आयात केलेले पळाले तर दुसरीकडे पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी देवूनही निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. जालना जिल्ह्यातील परतुर विधानसभा मतदारसंघाचे ए.जे. बोराडे, गंगाखेड मतदार संघातील विशाल कदम यांना पक्षाने उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखला. मात्र निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या रूपाली राजेश पाटील, कळमनुरी मतदारसंघाचे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले संतोष टारफे यांनी मात्र पराभवानंतरही उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

उमरगा या विधानसभा मतदारसंघात प्रवीण विरभद्र स्वामी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करत पक्षप्रमुख ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. तिकडे धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील यांनी निवडणुकीत निष्ठेच्या जोरावर विजय मिळवत उद्धव ठाकरे यांचे हात काही प्रमाणात बळकट करण्याचे काम केले. एकंदरीत मराठवाड्यात पक्ष फुटीनंतर संकटात सापडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अजूनही गद्दारी आणि विश्वासघाताचे धक्के बसतच आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT