Palghar LokSabha Constituency : तीन पराभवानंतर लोकसभेसाठी 'पालघर'मधून पुन्हा बळीराम जाधवांचे नाव चर्चेत!

Palghar Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे.
Palghar LokSabha Constituency
Palghar LokSabha Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाचा पहिला खासदार होण्याचा मान बळीराम जाधव यांना मिळाला. जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले राजकारणी आहेत. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ग्रामपंचायतीच्या कामामध्ये लक्ष घालून जाधव यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. सरपंच, सभापती, खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. सर्वसामान्य राहणीमान, संवेदनशील, संयमी आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी तळमळीने झटणारा राजकारणी म्हणून बळीराम जाधव यांना ओळखले जाते.

बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचे विश्वासू असलेले बळीराम जाधव हे 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्या निवडणुकीत त्यांनी चिंतामण वनगा यांचा पराभव केला होता. गरजू नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच्या तळमळीतून त्यांनी खासदारकीच्या काळात आदिवासी, मच्छिमार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवला. यूपीए सरकारमधील मोठ्या पक्षांच्या सोबत राहून आपली विकासकामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. शरद पवार, विलासराव देशमुख, एकनाथ गायकवाड या नेत्यांशी जवळीकता राखून त्यांनी आदिवासी बांधवांचे प्रश्न तडीस लावण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या कामामुळे मतदारांमध्ये त्यांची एक लोकनेता म्हणून ओळख निर्माण झाली होती.

Palghar LokSabha Constituency
Palghar Lok Sabha Constituency: पालघर मतदारसंघासाठी तीन वेळा पक्ष बदललेले राजेंद्र गावित पुन्हा मैदानात उतरणार ?

2009 ते 2014 या काळात केलेल्या कामाच्या जोरावर हितेंद्र ठाकूर यांनी 2014 ला पुन्हा एकदा जाधव यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवले होते. मात्र मोदीलाटेत त्यांचा पराभव झाला. पुढे 2018 आणि 2019 मध्येही जाधव यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली नाही. गत निवडणुकीत चिन्ह गोठवल्याचा आणि कार्यकर्त्यांच्या फुटीचा त्यांना फटका बसला होता. आता पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांच्या उमेदावारीची चर्चा सुरू आहे. मात्र यावेळी राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळते की हितेंद्र ठाकूर उमेदवारीची भाकरी फिरवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Palghar LokSabha Constituency
Palghar Nagar Parishad : पालघर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?

नाव (Name)

बळीराम सुकूर जाधव

जन्मतारीख (Birth date)

2 जून 1956

शिक्षण (Education)

आठवी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

बळीराम जाधव हे एका आदिवासी आणि सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून राजकारणात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील सायवन या गावातील शेतकरी सुकूर आणि शालूबाई जाधव यांच्या कुटुंबात बळीराम जाधव यांचा जन्म झाला. त्याचे आठवीपर्यंतचे शिक्षण वसई तालुक्यातील शाळेत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव वनिता जाधव आहे. जाधव यांना एक मुलगा आणि तीन मुली अशी एकूण चार अपत्ये आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

पालघर

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

बहुजन विकास आघाडी

Palghar LokSabha Constituency
Shivsena Political News : शिंदे गटाच्या खासदाराचा घरचा आहेर; पालघर जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

बळीराम जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंचपदापासून केली. ते 1978 ते 95 या काळात सायवन या गावचे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचीही निवडणूक लढवली होती. मात्र अनिता धांगडा यांच्याकडून त्यांचा पहिल्यांदा पराभव झाला. त्यानंतर काही काळासाठी ते वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. तसेच 1997 मध्ये जाधव यांनी वसई पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले होते. पालघर लोकसभा मतदारसंघातून जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला होता.

2009 मध्ये भाजपचे चिंतामण वनगा यांचा त्यांनी पराभव केला. त्यावेळी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे ते पहिले खासदार ठरले होते. त्यावेळी जाधव यांना 2,23,234 मते मिळाली होती, तर भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांना 2,10,874 मते मिळाली होती. पुढे खासदार म्हणून त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाकाच लावला होता. पहिल्यांदा संसदेत ज्यावेळी ते पालघरच्या प्रश्नावर बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांनी मदत केल्याची आठवण त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधव हे पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी घेत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यावेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळच्या मोदीलाटेत जाधव यांचाही पराभव झाला. भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांनी 5 लाख 33 हजार 201 मते घेत विजय मिळवला. जाधव यांना 2 लाख 93 हजार 681 मते मिळाली होती. पुढे 2018 मध्ये विद्यमान खासदार वनगा यांचे निधन झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळीदेखील बळीराम जाधव यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या निवडणुकीत भाजपकडून राजेंद्र गावित विजयी झाले होते.

2019 च्या निवडणुकीतही बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना पुन्हा एकदा संधी दिली. त्यावेळीही काँग्रेस, राष्ट्रवादीने जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडून त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. गावित यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढवली होती. गावित यांना 5,15,000, तर जाधव यांना 4,91,596 मते मिळाली होती.

आता आगामी लोकसभा निवडणुकीत जाधव हेच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मानले जात आहेत. मात्र यावेळी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. तसे झाले आणि जाधव यांना उमेदवारी मिळाली तर गेल्या निवडणुकीप्रमाणे इतर पक्षांची ताकद त्यांच्या पाठीशी राहणार नाही.

Palghar LokSabha Constituency
Lok Sabha Election 2024 : पालघरच्या जागेवरून पडली ठिणगी; महायुतीत होणार घमासान

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

बळीराम जाधव हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय राहतात. शेतकऱ्यांच्या शेतमालास पालघर ते नवी मुंबई यादरम्यान टोल आकारला जाऊ नये, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांना, मच्छीमारांना त्यांनी सातत्याने मदत केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जाधव यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. त्यासाठी जाधव हे समाजातील लहान लहान प्रश्न सोडवण्यसाठी झटताना दिसून येतात. त्यामध्ये आरोग्याच्या सुविधा, वाड्या-पाड्यांवर रस्ते अशी विकासकामे त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षाच्या माध्यमातून करून घेतली आहेत. डहाणू-नाशिक रेल्वेसाठी प्रयत्न, गॅस पाइपलाइन, आदिवासी वाड्या-पाड्यांवर मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी, मतदारसंघात उद्योग येण्यासाठी प्रयत्न केले आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 च्या निवडणुकीत बळीराम जाधव यांना शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

Palghar LokSabha Constituency
Palghar Politics : शिंदे-फडणवीसांकडून ठाकुरांचे तोंड भरून कौतुक; पालघरच्या राजकारणात नवा अध्याय !

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादी, माकप या महाआघाडीने बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली होती. तरीही जाधव यांना शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे ऐन निवडणुकीदरम्यान अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह गोठवण्यात आले होते. पक्षाचे उमेदवार चेतन पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसरे उमेदवार बळीराम जाधव यांना शिट्टी चिन्ह मिळणे अपेक्षित होते. मात्र घटनात्मक पेच निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने शिट्टी चिन्ह गोठवून जाधव यांना रिक्षा चिन्ह दिले होते. त्यावेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. चिन्हबदलाचा मोठा फटका जाधव यांना बसला.

या निवडणुकीवेळी शिवसेना - भाजप युती होती. या निवडणुकीवेळीही मोदीलाटेचा प्रभाव ओसरलेला नव्हता. त्यातच पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्याचाही या निवडणुकीवर प्रभाव होताच, परिणामी या निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचा उमेदवार निवडून आला. याचाच फटका बहुजन विकास आघाडीचे उमेदावर बळीराम जाधव यांनाही बसला. याशिवाय राजेंद्र गावित हे तत्कालीन खासदार होते. त्यांनी विकासकामे केली होती. आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी मदरासंघातील मूलभूत सोयी-सुविधांसह रोजगारनिर्मिती, मच्छीमारांचे प्रश्न सोडवणे, वाढवण बंदर अशा विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी युतीकडून आश्वासने देण्यात आली होती. त्याचाही प्रभाव मतदारांवर होताच.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

बळीराम जाधव यांचा मतदारसंघातील जनसंपर्क अत्यंत प्रभावी आहे. पालघर हा आदिवासीबहुल मतदारसंघ आहे. जाधव हेही आदिवासी समाजातून आलेले आहेत. 2009 मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. शेती, मासेमारी व्यवसाय यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या. मतदारसंघात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीसह मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यावर त्यांनी भर दिला होता. जाधव हे जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन काम करणारे राजकारणी आहेत. मतदारांना 24 तास उपलब्ध होणारे एक राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जाते. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ते जनसेवेत सक्रिय असतात. त्यामुळे त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क चांगला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

बहुजन विकास आघाडीचे नेते बळीराम जाधव हे सोशल मीडियावर सक्रिय नाहीत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

बळीराम जाधव हे एक संयमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षाची भूमिका मांडत असताना कधीही आक्रमक भाषेचा वापर केला नाही. दरम्यान, त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पालघरमध्ये 60 हजार बोगस मतदार असल्याचा दावा केला होता. या संदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. याव्यतिरिक्त तारापूर अणू प्रकल्पातून होणाऱ्या किरणोत्सर्गाविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या विरोधात जनतेने एकत्र येऊन एका सुरात रडून आपल्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात, असे आवाहन केले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

हितेंद्र ठाकूर

Palghar LokSabha Constituency
NCP Hearing : शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवरून चर्चेला उधाण!

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

शांत, संयमी आणि जनतेमध्ये राहून मतदारांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ असलेला राजकारणी अशी ओळख बळीराम जाधव यांची आहे. जाधव आणि हितेंद्र ठाकूर या जोडीला फेव्हिकॉल का जोड म्हणून ओळखले जाते. हितेंद्र ठाकूर यांचा जाधव यांच्यावर असलेला विश्वास ही आणि त्या विश्वासास पात्र होण्याची जाधव यांच्या कामाची शैली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीमध्ये जाधव यांचे स्थान अढळ मानले जाते. जाधव यांच्याकडे संघटनकौशल्य, याशिवाय सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितच होऊ शकतो. तसेच विद्यमान खासदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यातच या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

बळीराम जाधव हे सर्वसामान्य जनतेतून मिसळून काम करणारे लोकप्रतिनिधी असले तरी यापूर्वीच्या सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या तिन्ही निवडणुकांत त्यांनी केलेल्या विकासकामांना आणि कामाच्या पद्धतीला मतदारांकडून नाकारले गेले आहे. तसेच आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्यावतीनेही जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यातील राजकारणातील सध्याची राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सद्यःस्थितीत तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र मागील तीन निवडणुकांत जाधव यांना जनतेने नाकारले आहे. त्यामुळे यावेळी ठाकूर यांच्याकडून नवीन चेहऱ्याला उमेदवारी देण्यासंदर्भात विचार करत जाधव यांचा पत्ता कट झाल्यास बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचे नाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ शकते. शिवाय बळीराम जाधव हे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारात आले आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, असे मत व्यक्त करणारे जाधव पक्ष देतील तो निर्णय मान्य करून काम करतील.

Palghar LokSabha Constituency
Kolhapur NCP Meeting : का रे दुरावा! अजितदादांच्या सभेत नवे जिल्हाध्यक्ष शेजारी अन् ए.वाय कोपऱ्यात...

पालघर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य आहे. तर इतर तीन मतदारसंघांत राष्ट्रवादी, माकप आणि शिवसेनेचे आहेत. दरम्यान, यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशी लढवली जाणार आहे.

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडे तेवढ्या ताकदीचा उमेदवाराचा अभाव आहे. ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती कामडी यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी त्यांची ताकद ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील. जर ठाकरे गटाने उमेदवार नाही दिल्यास बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com