

Parbhani ZP : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मोठा भाऊ ठरलेल्या भाजपाने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निकाल जाहीर होताच, राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, शिंदेची शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे, त्यांना सोबत घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू, असे स्पष्ट केले होते. बोर्डीकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर हे ही ईरेला पेटले होते.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसे आणि शिंदेंची शिवसेना यांना एकत्र आणत मोठा भाऊ ठरलेल्या भाजपालाच सत्तेबाहेर ठेवण्याच्या हालचाली विटेकर यांनी सुरू केल्या होत्या. स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील वाढता वाद लक्षात घेता महायुतीच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक नेत्यांची समजूत घातली.
त्यानंतर आता महायुतीचं जमल्याचे आणि जिल्हा परिषदेत पुढील पाच वर्ष एकत्र काम करण्याचा निर्णय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केला. मुंबईत झालेल्या चर्चेनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अर्थात भाजपाच्या वाट्याला जाणार आहे. तर उपाध्यक्ष पद दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला महत्त्वाचे सभापती पद दिले जाणार आहे.
झेडपीतील सत्तेचा हा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर आता अध्यक्षपद हे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लता वाकळे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य व आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
एकमेकांना सोबत न घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या परभणी जिल्ह्यातील मेघना बोर्डीकर आणि आमदार राजेश विटेकर या दोन नेत्यांचे पुढील पाच वर्ष जिल्हा परिषदेत कसे जमणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. परंतु दोन्ही नेत्यांना वरिष्ठांनी सबुरीने घ्या, असा सल्ला दिल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महायुतीतील या बेबनावाचा आपल्याला लाभ होतो का? या प्रयत्नात असलेल्या महाविकास आघाडीला मात्र महायुतीचे जमल्याने धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.