सुषेन जाधव
Paithan Consituency News : माझे वडील संदीपान भुमरे यांनी पैठण-आपेगाव प्राधिकरणाचे काम हाती घेतले आणि मी त्याचा कायम पाठपुरावा करत आलो. माझा मतदारसंघ संतांची भूमी आहे. आजघडीला नाथमंदिराचा कायापालट केला. परिसरात अन्नछत्र सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे 'सकाळ'च्या आध्यात्मिक वारसाचा धागा पकडून मलाही पैठण येथील संतपीठ हे संत विद्यापीठ व्हावे, असे वाटते. त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेचे आमदा विलास भुमरे यांनी सांगितले.
'सकाळ'ने 'माझा मतदारसंघ, माझी भूमिका'हा उपक्रम हाती घेतला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिल्ह्यातील आमदारांनी विकासाच्या प्रश्नावर बोलावे, आपली भूमिका मांडत ब्ल्यू प्रिंटवर चर्चा करावी हा या उपक्रमाचा हेतू आहे. शनिवारी (ता. दोन) झालेल्या या कार्यक्रमात पैठणचे (Paithan) आमदार विलास भुमरे यांनी आपल्या मतदारसंघाविषयची भूमिका मांडली.
ब्रह्मगव्हाण जलसिंचन उपसा योजना माझी महत्त्वाकांक्षी योजना आहे. (Shivsena) माझा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे ही त्यामागची माझी भूमिका आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत 890 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यातून बरीच विकासकामे मार्गी लागली. बालानगर, खेर्डा भागातील मोसंबी डाळिंबातून कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आले. या उर्वरित कामाचा टप्पा आता मी पूर्ण करणार आहे.
दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी झाल्या, पाणंद रस्ते झाले. शेतकऱ्यांना पाणंद रस्ते नव्हते, हे रस्ते झाल्यानंतर शेतकर्यांचे उत्पन्न पाच लाखांहून पंधरा लाखांवर गेले. मला राजकीय वारसा आहे, हे खरे आहे. परंतु, कामे केली नाही तर तुम्हाला पसंती मिळत नाही. त्यामुळे वारसा असला तरी कर्तृत्व सिद्ध करावे लागते. माझे वडील संदीपान भुमरे यांनी पैठण-आपेगाव प्राधिकरणाचे काम हाती घेतले आणि मी त्याचा कायम पाठपुरावा करत आलो.
माझा मतदारसंघ संतांची भूमी आहे. आजघडीला नाथमंदिराचा कायापालट केला. परिसरात अन्नछत्र सुरू केले. मलाही पैठण येथील संतपीठ हे संत विद्यापीठ व्हावे, असे वाटते. कौशल्य विकास वाढला की रोजगाराची हमी मिळते, या माध्यमातून आपण तशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे विलास भुमरे यांनी कार्यक्रमात सांगितले.
मोसंबी सिट्रस सेंटरसाठी पुढाकार
मोसंबी सिट्रस सेंटरसाठीही आपण पुढाकार घेणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे मोसंबी फळाच्या जितक्या जाती (वाण) तितकी रोपे आता सिट्रस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. त्याअंतर्गत सुरवातीला अडीच लाख रोपे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शेतमालाला भाव नसेल तर शेतकर्यांना अल्प भावात विक्री करावी लागते. त्याऐवजी शीतगृहात (कोल्ड स्टोरेज) ठेवल्यास शेतमाल अधिक काळ टिकतो. दरम्यान, भाववाढ झाल्यानंतर शेतकरी विक्री करू शकतात. त्यासाठी आपण कोल्डस्टोरेजसाठी येत्या दोनच महिन्यांत प्रस्ताव तयार करणार असून, शासन दरबारी देणार आहोत, असे भुमरे यांनी स्पष्ट केले.
रस्ते चांगले करणार..
जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाबार्डच्या माध्यमातून दोनशे कोटी रूपये दिले आहेत. त्यामुळे मतदार संघातील 10 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. हे क्षेत्र अधिकाधिक पटीत कसे वाढेल यावर भर देणार आहे. मतदार संघातील पैठण ते शेवगाव, पैठण ते पाचोड हे मुख्य रस्ते, त्यानंतरही नाथनगरी म्हणून जोडले गेलेले सर्व छोटे-मोठे रस्ते चांगले करणार आहे.
निम्म्याहून अधिक मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण माझ्या मतदारसंघात आहे. त्यातील गाळ काढण्याची मागणी मी सभागृहात केली. या धरणातील गाळ काढल्यानंतर शेतकर्यांसह औद्योगिक वसाहतींना दिलासा मिळेल. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. ही बाब आपण मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनीही याला होकार दिल्याचे आमदार भुमरे म्हणाले.
आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम
अनेक आमदारांच्या मतदारसंघांत औद्योगिक वसाहती, रोजगाराचे प्रश्न आहेत. परंतु, डीएमआयसीसारखा प्रोजेक्ट माझ्या मतदारसंघात झाला. यामुळे औद्योगिकीकरणाचा अभ्यास करून त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि त्यासाठीचे कौशल्य यावर आधारित अभ्यासक्रम शासकीय आयटीआयमध्ये सुरू करण्यासंदर्भातील पत्र मी संबंधित खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिले आहे. मतदारसंघात रोजगार मेळावा घेऊन दोन हजार तरुणांच्या हाताला काम दिल्याचेही भुमरे यांनी सांगितले.
पैठण एमआयडीसीला देणार चालना
पैठण एमआयडीसीत अनेकांनी भूखंड घेऊन ठेवले. परंतु, उद्योगाच्या अनुषंगाने पुढे काहीच केले नाही, ते भूखंड आता परत घेऊन नव्याने तरुणांना रोजगारासाठी संधी देण्यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. यातून हळूहळू पैठण एमआयडीसीला चालना मिळेल. प्रत्येक उच्चशिक्षित तरुणाला नोकरी मिळेलच असे नाही, त्यामुळे हळूहळू आता उद्योगधंद्यांकडे डायव्हर्जन करायला हवे. त्यासाठी तरुणांना टार्गेट करून स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम वाढविणार आहे.
संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट करणार
जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी चारते ते सातशे कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे, तसे आमचे बोलणेही झाले आहे. यातून ज्ञानेश्वर उद्यानात बोटिंग तसेच इतर सुविधांसह कामे केली जाणार आहेत. याशिवाय विश्रामगृहाचेही नूतनीकरण केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, माझ्या मतदारसंघावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष असल्याचे भुमरे म्हणाले.
पैठणीचे क्लस्टर कारायचे.. पण
पैठणच्या पैठणीचे क्लस्टर तयार करण्यासाठी सर्वांत अगोदर क्लस्टरची मागणी केली होती. परंतु, ज्या नोंदणीकृत वीणकर महिला आहेत, त्यांचा समूह करावा लागतो, नेमके महिलांमध्ये गट-तट असल्याने हे होऊ शकले नाही, असे असले तरी त्यावर तोडगा काढून क्लस्टरसाठी पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले. क्लस्टर नाहीच झाले तर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. पायाभूत सुविधांवर भर देणार असून, नाथ महाराजांच्या नगरीत नव्याने उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे, तसा प्रस्तावही शासन दरबारी दिला. मुलींच्या कारागृहाची इमारत जीर्ण झाली होती, नव्याने इमारतीसाठी 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिल्याचेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.