छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेना महायुतीच्या प्रदीप जैस्वाल यांनी अखेर जागा राखली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे दोन उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने हिंदू मतांचे विभाजन होऊन एमआयएमचे नासेर सिद्दीक निवडून येणार असा सगळ्यांचाच अंदाज होता. परंतु औरंगाबाद मध्य मतदार संघात `वोट ना कटे, ना बटे` असेच म्हणावे लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत धडधड वाढवणाऱ्या मध्य मधील लढतीत अखेर प्रदीप जैस्वाल यांनी एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांच्यावर मात केली.
तेविसाव्या फेरीचा निकाल जाहीर झाला तेव्हा प्रदीप जैस्वाल (Pradip Jaiswal) यांना 85459,शिवसेना महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांना 36390, तर एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना 77340 मते मिळाली. प्रदीप जैस्वाल यांनी 8119 मतांच्या फरकाने विजय मिळवत मध्यमधून सलग दुसरा विजय नोंदवला. शिवसेना विरुद्ध शिवसेना या मतदारसंघात एकमेकांच्या समोर आल्याने एमआयएमने या मतदारसंघात मोठी जोखीम पत्करली. इम्तियाज जलील यांनी मध्य च्या ऐवजी पुर्वमधून लढण्याचा निर्णय घेतला.
तर मध्य मधून पुन्हा नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. पण हिंदू मतांमध्ये अपेक्षित विभाजन न झाल्याने एमआयएमचा खेळ फसला. काही फेऱ्यांमध्ये नासेर सिद्दीकी यांनी आघाडी घेत शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल व त्यांच्या समर्थकांचे टेन्शन वाढवले होते. (AIMIM) मात्र ती आघाडी पुढच्या फेरीत मोडीत काढत अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये प्रदीप जैस्वाल यांनी परत कमबॅक केले आणि त्याचे विजयात रुपांतर केले. प्रदीप जैस्वाल यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत फटाके फोडले.
शहरातील मध्य आणि पुर्व या दोन मतदारसंघात ओवेसी बंधूंनी जोरदार प्रचार केला होता. विशेषतः मुस्लिम बहुल भागात त्यांच्या पदयात्रा, सभा, काॅर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मतांमध्ये फूट पडू देऊ नका, असे आवाहन करत ओवेसी बंधूंनी चार ते पाच दिवस शहरात तळ ठोकला होता. एमआयएमच्या मतांमध्ये फूट पडली नसली तशी ती हिंदू मतांमध्येही पडली नाही. शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांनी पंतगाला जास्त हवा न मिळू देता त्याला जमीनीवर आणले.
शिवसेना महायुतीचे प्रदीप जैस्वाल, महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात आणि एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांच्यात या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आधी जाहीर झालेले अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने इथे मोठा ट्विस्ट आला होता. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या आधीच तनवाणी यांनी मशाल खाली ठेवत उद्धव ठाकरे यांना दुसरा पर्याय देण्याची संधी दिली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना तातडीने उमेदवारी देत मराठा कार्ड खेळले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा जसा एमआयएमला झाला होता, तशीच परिस्थिती 2024 मध्ये दिसेल हा अंदाज मतदारांनी खोटा ठरवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्दीकी यांनी जैस्वाल यांना चांगली लढत दिली होती. विशेष म्हणजे तेव्हा शिवसेना-भाजप युती होती, तरी एमआयएमने मुस्लिम वोट बॅंकेच्या जोरावर 80 हजार मतांपर्यंत मजल मारली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी `मध्य` मधून मताधिक्य मिळाले. त्यामुळेच एमआयएमने इम्तियाज जलील यांनी स्वतः मतदारसंघ बदलला.
मात्र हा बदल मध्य आणि पुर्व अशा दोन्ही मतदारसंघात एमआयएमच्या अंगलट आला आहे. मध्य मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी मिळालेल्या शिवसेना महाविकास आघाडीच्या बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक पावित्रा घेत महायुतीच्या प्रदीप जैस्वाल यांना आव्हान दिले होते. जैस्वाल यांच्या व्यवसायावरून मी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी नाही, तर तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी काम करणार असल्याचे थोरात यांनी प्रचारात सांगितले. या शिवाय महायुतीकडून सुरु असलेल्या `बटेंगे तो कटेंगे`ला ही ना बटेंगे ना कटेंगे, हम जुडेंगे औरे जितेंगे, असे प्रत्युत्तर दिले.
मध्य मतदारसंघात शहराच्या नामकरणाच्या मुद्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून प्रमुख तीनही पक्षाच्या उमदेवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. वंचितने या मतदारंसघात जावेद कुरेशी यांना उमेदवार दिली, पण ते चमक दाखवू शकले नाही. महायुती- महाविकास आघाडी- एमआयएम मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत अखेर प्रदीप जैस्वाल यांनी बाजी मारत एमआयएमचा खेळ खल्लास केला.
2009
प्रदीप जैस्वाल (अपक्ष) विजयी- 49965 मते
विकास जैन (शिवसेना) पराभूत-33988 मते
कदीर मौलाना (राष्ट्रवादी) पराभूत-41583 मते
2014
इम्तियाज जलील (एमआयएम) विजयी- 61841
प्रदीप जैस्वाल (शिवसेना) पराभूत- 41861
किशनचंद तनवाणी (भाजप) पराभूत-40770
2019
प्रदीप जैस्वाल (शिवसेना) विजयी-82217
नासेर सिद्दीकी (एमआयएम) पराभूत-68325
अमित भुईगळ (वंचित आघाडी) पराभूत 27302
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.