

Solapur, 20 February : सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या यादीवरून प्रचंड गोंधळ झाला. भारतीय जनता पक्षाकडून नऊपैकी आठच नावे जाहीर केल्याने त्यावर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घातला. या गोंधळातच पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ भाजपवर आली.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी (Nominated corporator) इच्छूक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका इच्छुकाने मला मेसेज केला आहे. त्याने बालाजी सरोवर येथे असलेल्या काही नेत्यांची, काही आमदाराचं नाव लिहून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी सभागृहात दिली, त्यामुळे पहिल्याच सभेत मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाने (BJP) नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत १०२ जागांपैकी ८७ जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या भाजपच्या वाट्याला नऊ जागा आल्या होत्या. या नऊ जागांवर भाजपने नावे घोषित करणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने केवळ आठ नावांची घोषणा करून कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला.
त्यावर शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी आक्षेप घेतला. भाजपने 9 पैकी 9 नावे आजच घोषित करावी, अशी मागणी अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली. मात्र, भाजपकडून पुढच्या सभेत नाव घेणार, अशी भूमिका घेतली आहे. याच मुद्यावरून काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठाकडे धावून गेले.
महापौर विनायक कोंड्याल हे सभेचे कामकाज करत असताना अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत आक्रमक भूमिका मांडली. विरोधकांचा गोंधळ पाहून महापौर विनायक कोंड्याल सभा तहकूब करत कामकाज स्थगित केले. त्यामुळेही विरोधकांनी तीव्र नापासंती व्यक्त केली.
शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले, भाजपचे लोक सभागृह चालवू शकत नाहीत. सभागृह नेते नरेंद्र काळे हे तर शिस्तीचे धडे सांगतात. स्वीकृत नगरसेवकपदासाठी ज्यांनी भारतीय जनता पक्षाचा अर्ज भरला आहे, त्या इच्छुकाचा मला मेसेज आला आहे. आज बालाजी सरोवरमध्ये असलेल्या काही नेत्यांचं आणि आमदारांचं नाव लिहून आत्महत्या करणार आहे, असा मेसेज मला आला आहे, तो मी सभागृहात सांगितलेला आहे. सभागृहात तुम्ही नाव कट केले आहे, ते कोणाचे नाव आहे, अशी मी विचारणा केली. हे कळाल्यानंतर भाजपचे महापौर आणि इतरांवर पळ काढायची वेळ आली आहे. ह्याच्या कार्यकर्त्याला आत्मह्या करतो म्हटल्यानंतर पळून गेलेले आहेत.
भाजपमध्ये कोण पक्ष वाढवत आहे, कोणी पक्षाला मोठं केलं आहे आणि आज मलई कोण खातंय, हे सगळ्यांना माहिती आहे. मी आज ते नाव जाहीर करू शकतो. ते दररोज तुम्हालाही भेटतात. त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, असेही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे यांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.