
Ajit Pawar News : कराड दक्षिणेतील काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली होती. त्यानंतर आज (12 मार्च) अजित पवार कराड दौऱ्यावर आल्यानंतरही त्यांची उंडाळकर यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र उंडाळकर यांच्या अजित पवारांसोबतच्या भेटीचा आणि बैठकीच्या उत्साहाचा कराड दक्षिणचे भाजप आमदार अतुल भोसले यांनी अवघ्या काही मिनिटांत बेरंग केला.
आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे. यानिमित्ताने चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी अजित पवार कराडला आले होते. सकाळी आठच्या सुमारास ते प्रितिसंमावर दाखल झाले. मंत्री मकरंद पाटील, आमदार अतुल भोसले, अमोल मिटकरी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासोबतच उदयसिंग पाटील उंडाळकर हे देखील या ठिकाणी अजित पवार यांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते. प्रितिसंगमावरून अजित पवार थेट उंडाळकर यांच्या कोयना बँकेत गेले. तिथे दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
प्रवेशानंतर उंडाळकर गटाला कशी ताकद दिली जाणार? उदयसिंह यांना कोणती मोठी जबाबदारी दिली जाणार? भाजपचा स्थानिक आमदार असल्याने पुढील वाटचाल कशी असणार? बँक, दूध संघ, कारखाना इथले विविध प्रलंबित प्रश्न अशा अनेक गोष्टींवर दोघांमध्ये चर्चा झाली. त्याचवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजप आणि भोसले यांना शह देण्यासाठीची उंडाळकर गटाची खेळी भोसले यांनी ओळखली आणि पुढची चाल खेळली. अजितदादा परत जाताना भोसले यांनी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास सुरू केला.
तब्बल दीड अजित पवार आणि अतुल भोसले यांच्यात राजकीय चर्चा झाली. या प्रवासाच्या निमित्ताने अजितदादा यांच्यासोबत माझेही चांगले ट्युनिंग आहे भोसले यांनी दाखवून दिले असल्याची चर्चा आहे. एकूणच पवार यांच्या कराडच्या दौऱ्यात राजकीय डाव-प्रतिडाव पाहायला मिळाला. आता अजित पवार उंडाळकर गटाला कशी ताकद देणार आणि उदयसिंह यांचे पुनर्वसन कसे करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अतुल भोसले यांच्याशी उंडाळकर यांना जुळवून घ्यायला लावणार की पुढच्या पंचवार्षिकची तयारी म्हणून फ्री हँन्ड देणार याची कराडमध्ये चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.