
Pandharpur, 27 February : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या विधानामुळे सोलापूर जिल्ह्यात चर्चेत आहेत. रोखठोक वक्तव्यामुळे खरे यांनी राष्ट्रवादी नेत्यांचीही पंचाईत करून ठेवली आहे. तसेच प्रकार पंढरपूरच्या आमसभेत आज घडला आहे. पंढरपूरमधील अवैध वाळू उपशावरून आमदार खरे यांनी सत्ताधारी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना धारेवर धरले. त्यात दोघांमध्ये स्टेजवरच खडाजंगी झाली.
पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदारसंघाची आज पंचायत समितीच्या इमारतीत आमसभा पार पाडली. या आमसभेला पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे हे चार आमदार उपस्थित होते. पंढरपूर तालुका हा चार मतदारसंघात विभागला गेला असल्याने हे चारही आमदार या आमसभेत उपस्थित होते.
भीमा नदीतून होणाऱ्या अवैध वाळूउपशाबाबत अरुण कोळी यांनी आमसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी उत्तर देताना पोलिस कारवाई करत आहेत, असे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या अरुण कोळी यांनी ‘दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही,’ असे सांगून वाळूतस्कारांना पाठीशी घालू नका, अशी विनंती केली.
आमदार आवताडे यांनी अवैध वाळू तस्करांच्या विरोधात २२ कारवाया केल्याचे आमसभेत सांगितले. त्यावरही अरुण कोळी यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वाळू तस्करांना साहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्या वेळी मोहोळेचे आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी हस्तक्षेप करत वादात उडी घेतली.
मी आमदार झाल्यानंतर मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद केला आहे. मग, पंढरपूर तालुक्यातील वाळू उपसा का बंद होत नाही, असा सवाल आमदार राजू खरे यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांना केला. त्या वेळी आवताडे आणि खरे यांच्यात अवैध वाळू उपाशाच्या मुद्यावर व्यासपीठावर जोरदार खडाजंगी झाली.
आमसभेचे अध्यक्ष तथा आमदार अभिजीत पाटील यांनी अखेर मध्यस्थी करत दोघांमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार खरे आणि आवताडे यांच्यातील कलगीतुरा हा सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
राजू खरेंची यापूर्वीची गाजलेली विधाने
मी नावालाच तुतारीचा आमदार आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे आपले सरकार आहे, असे विधान राजू खरे यांनी पंढरपुरातील एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर सोलापूर डीपीसीच्या बैठकीत मला नाईलाजाने तुतारी हाती घ्यावी लागली असे म्हटले होते. त्या वेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समोर पत्रकार असल्याचे लक्षात आणून दिले होते, तरी त्यांनी असू द्या की म्हणत आपल्या विधानावर ठाम राहिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.