Solapur, 15 April : मोहिते पाटील यांच्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नारायण पाटील हे येत्या २६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी (ता. 14 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आज माढ्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी शिवसेनेचा (शिंदे गटाच्या) राजीनामा दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. तो स्वीकार करावा, असे नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. नारायण पाटील यांनी 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.
विद्यमान आमदार असूनही 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने विशेषतः तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्यापेक्षा नारायण पाटील यांना जादा मते मिळाली हाेती. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली हेाती.
दरम्यान, माजी आमदार नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची येत्या 26 एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite patil) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील (Narayan Patil) यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली हेाती. आता पाटील हे येत्या 26 एप्रिल रोजी करमाळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.