

समरजीत घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापुरात राजकीय चर्चांना उधाण
महायुतीतील महाडिक आणि मंडलिक यांच्यातील स्पर्धेवर प्रश्नचिन्ह
स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
kolhapur politics : ठाणे, कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सातारा, सांगली अशा विविध ठिकाणी झालेल्या महायुतीतील वादात आता कोल्हापूरची भर पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी आज (बुधवारी, ता ८) भाजप प्रवेश केला. मुंबईतील भाजप मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी घरवापसी केली. त्यांच्या याच घरवापसीवरून आता विविध चर्चांना तोंड फुटले असून समरजीत घाटगेंचा प्रवेश हा लोकसभेला खासदार धनंजय महाडिक यांना स्पर्धा की शिवसेनेच्या संजय मंडलिकांना ओपन चॅलेंज आहे अशा चर्चा आता रंगताना दिसत आहे.
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट न मिळाल्यानं समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच कागलच्या गैबी चौकात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भली मोठी जाहीर सभा घेत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी भाजप प्रवेश केला आहे.
यावर घाटगे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यामागे सगळे प्रयोग झाले असून आता कोणत्या प्रयोगाला स्कोप नाहीये. रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आता काम करायचं आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काम करायचं असल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हसन मुश्रीफ आणि त्यांच्यातील वैर संपले.
जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळीही दिसले. आता येत्या काळात देखील ते को-ऑर्डिनेशन जिल्ह्यात दिसेल. मी माझ्या मूळ पक्षात परत येत आहे, त्यामुळे कोणाला अडचण होण्याचे कारण नाही. महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच शरद पवार यांना भेटून आपली भूमिका सांगितली होती. शरद पवार यांना सांगूनच हे पावलं उचलल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
पण आता सगळ्या घडामोडीनंतर भाजपच्या मनात नेमकं काय आहे असाच प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात असून ते संभ्रमात दिसत आहे. कारण समरजीत घाटगे यांच्याबाबत या आधी देखील ते लोकसभा लढवतील अशा चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांना विधानसभा आणि ती देखील मुश्रीफ यांच्याविरोधात लढवायची होती. तसा त्यांनी प्रयत्नही केली, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. यानंतरच समरजीत घाटगे यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा भाजपकडे वळवत मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेण्याचा प्लॅन आखला आहे.
तर त्यांच्या घरवापसीतून भाजपला नवा चेहरा द्यायचा असल्याच्याही आता चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत संपणार आहे. त्यामुळे त्यावेळी रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी आणि 2029 च्या लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडे दोन पर्याय असणार आहेत. यातील राज्यसभा कोल्हापुरऐवजी अन्य जिल्ह्याला दिल्यास 2029 च्या लोकसभेसाठी घाडगे आणि महाडिक यांच्या स्पर्धा दिसून येऊ शकते. पण राज्यसभा कोल्हापुरातच द्यायची ठरल्यास भाजपने समरजीत घाटगेंना राज्यसभा देवून दिल्लीत पाठवले तर धनंजय महाडिक यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा होईल आणि कागलसह जिल्ह्यातील वाद मिटवण्यात यश येईल.
मंडलिकही मैदानात
मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार मंडलिक हेही तयारीला लागले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोनच दिवसांपूर्वी लोकसभेबाबत भाष्य केलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप तीन एक वर्षे बाकी असतानाच त्यांनी थेट प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला करायचा असून पुढील निवडणुकीपर्यंत पक्षाची बांधणी चांगली व्हायला पाहिजे. तसे झाले तरच मंडलिक यांचा दीड लाखांनी विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे मंडलिक हेच शिवसेनेचे लोकसभेसाठी उमेदवार असतील अशी घोषणा अप्रत्यक्षपणे केली.
सध्या तरी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार समोर आले आहेत. कोल्हापुरच्या राजकीय नाडीची जाण असणाऱ्या काही लोकांकडून आणखी एक नाव या यादीत जोडले गेले आहे. यामुळे कोल्हापुरात दोन नाही तर लोकसभेला तीन चेहरे असतील असे बोलले जात आहे.
2029 च्या लोकसभा निवडणुकीला कोल्हापूरमधून महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती विरुद्ध महायुती ही लढत असे बोलले जात आहे. पण खरी लढत कोणात होणार हे आगामी लोकसभेलाच समोर येणार असून भाजप धनंजय महाडिक यांना मैदानात उतरवणार की नवा चेहरा म्हणून समरजीत घाटगे यांना संधी देणार हे पहावे लागणार आहे. तर शिवसेनेना महायुती म्हणून माजी खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेणार हे देखील स्पष्ट होईल.
1. समरजीत घाटगे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे
2. त्यांच्या प्रवेशामुळे कोणत्या चर्चा सुरू झाल्या?
महाडिक आणि मंडलिक यांच्यातील राजकीय स्पर्धेच्या चर्चा सुरू झाल्या
3. हा मुद्दा कोणत्या भागाशी संबंधित आहे?
कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित आहे
4. महायुतीत काय परिणाम होऊ शकतो?
अंतर्गत संघर्ष आणि स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे
5. कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत?
धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांची नावे चर्चेत आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.