

Pune News : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत चक्क कॅमेरायुक्त चष्म्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन करत कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन उमेदवारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या तांत्रिक तपासानंतर या ‘मुन्नाभाई’ उमेदवारांचा पर्दाफाश झाला.
महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी परीक्षा दिली. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या परीक्षेत ४२ हजारांहून अधिक उमेदवारांपैकी सुमारे २० हजार ९३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी सुरू असताना हा गंभीर गैरप्रकार समोर आला.
‘लॉगशिट’ने उघड केला संशय
परीक्षेच्या वेळी प्रश्न सोडविण्याची पद्धत संशयास्पद असल्याचे काही उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशिटमध्ये दिसून आले. त्यानंतर महापालिकेने सर्व उमेदवारांच्या लॉगशिटची तांत्रिक तपासणी केली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील आयकॉन डिजिटल झोन, चिखलठाणा या परीक्षा केंद्रावरील तीन उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. या उमेदवारांनी परीक्षेच्या शेवटच्या अर्ध्या तासात तब्बल १०० प्रश्न सोडविले. त्यातील ९० पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे अचूक आल्याने त्यांचा परीक्षेतील सहभाग तपासणीच्या रडारवर आला.
पहिल्या अर्ध्या तासात केवळ प्रश्न वाचले
तांत्रिक तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात संबंधित उमेदवारांनी केवळ प्रश्न वाचल्याचे दिसून आले. त्यानंतर ते स्वच्छतागृहात गेले. परत आल्यानंतर त्यांनी वेगाने प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. प्रश्न सोडविताना त्यांनी माउसचा वापर केला नसल्याचे तपासात दिसून आले. त्यामुळे संशय अधिक बळावला. चौकशीत चष्म्यात कॅमेरा असलेले अत्याधुनिक उपकरण वापरून प्रश्नपत्रिका स्कॅन करण्यात आली आणि ती पुढे पाठविण्यात आल्याची शक्यता तपासात समोर आली आहे.
२० हजारांहून अधिक लॉगशिट तपासल्या
जवळपास दीड महिन्यापासून या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू होता. परीक्षा दिलेल्या २० हजार ९३५ उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशिटची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संशयास्पद पद्धतीने परीक्षा देणारे तीन उमेदवार आढळले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांच्या वैयक्तिक डेटाचीही पडताळणी केली. या तपासानंतर संबंधित उमेदवारांसह त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्तांचा दुजोरा
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनीही या प्रकरणाच्या तपासाला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात गजानन पाचे, अंकित वाघमारे यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या संस्थेतील विकास गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचे नेटवर्क आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.