

Solapur, 10 March : सोलापूर जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या रश्मी बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला मंगळेवढ्यातील प्रदीप खांडेकर यांना उपनेतेपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दोन नावे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. त्यांच्यावर आता गटनेते आणि उपनेतेपदाची जबाबदारी दिल्याने अध्यक्षपदाच्या शर्यतीतून त्यांची नावे मागे पडली आहेत, त्यामुळे अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ६८ जागांपैकी ३८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात अध्यक्षपदी प्रथमच भाजप सदस्य विराजमान होणार आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेचा भारतीय जनता पक्षाचा पहिला अध्यक्ष कोण होणार, याबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या करमाळ्याच्या रश्मी बागल (Rashmi Bagal) यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वास्तविक पांडे गटातून निवडून आलेल्या बागल यांना अध्यक्षपदाची अपेक्षा होती, पण त्यांना जिल्हा परिषदेतील पक्षाच्या सदस्यांकडून काम करून घेण्याचे आणि त्यांना शिस्त लावण्याचे काम देण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील भोसे गटातून निवडून आलेले प्रदीप खांडेकर यांचेही नाव गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी पुढे आले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी चर्चेत आलेल्या खांडेकर यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत ते रश्मी बागल यांना सहकार्य करतील.
सोलापूर जिल्हा पश्चिम विभागाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे प्रतोदपद देण्यात आलेले आहे. सांगोला तालुक्यातील चोपडी गटातून निवडून आलेले केदार-सावंत यांच्याकडे व्हीप काढण्याचे महत्वाचे काम असणार आहे. सांगोल्याचे केदार सावंत यांच्याकडे प्रतोदपद देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेतील कंट्रोल माढा लोकसभा मतदारसंघात असेल, याची काळजी घेतल्याचे दिसून येते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले नेताजी खंडागळे यांच्या खांद्यावर भाजपची बाजू मांडण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेत काम करण्याबरोबरच त्यांना पक्षाचा किल्लाही लढवावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.