
Mumbai, 03 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सलगी वाढत आहे. पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला दांडी मारणारे आमदार खरे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर बिनदक्तपणे वावरत आहेत. सोलापूर दौऱ्यावर येणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्र्यांच्या स्वागताला जाणारे राजू खरे हे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणारे राजू खरेंवर कारवाई करण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने मोठे विधान केले आहे.
शिवसेनेच्या व्यासपीठावर वारंवार हजेरी लावणारे राजू खरे यांच्यावर कारवाई करणार का?, असा प्रश्न पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP SP) संबंधित नेत्याला विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘आमदार राजू खरे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, ’असे सांगितले. त्यासंदर्भात बाईट देण्याची विनंती केली असता त्यांनी आपण बाईट देणार नसल्याचे स्पष्ट केले.
मोहोळ मतदारसंघातून राजू खरे (Raju Khare) हे अवघ्या पंधरा दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर पंढरपुरात झालेल्या पहिल्याच सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना ‘हा तुतारीवाला नुसता नावालाच आहे. राज्यातील सत्ता सुद्धा आपली आहे, ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणे येणार आहे, असे विधान केले होते.
त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीत खरे यांनी ‘मला चुकून तुतारी घ्यावी लागली, मी तीस वर्षे तुमच्या सोबत होते,’ असे गोरेंना उद्देशून म्हटले होते, त्याचवेळी धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘समोर पत्रकार आहेत’, अशी आठवण करून दिली होती, मात्र खरे यांनी त्यालाही न जुमानता आपल्या विधानावर ठाम राहत ‘समोर पत्रकार असले तर असू द्या’ असे सर्वांसमोर म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापुरातील मेळाव्यालाही खरे यांनी दांडी मारली होती. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या सांगोल्यातील कार्यक्रमाला खरे यांनी हजेरी लावली होती. अक्कलकोट येथे झालेल्या माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रवेशाच्या वेळी खरे हे एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे खरे हे कागदोपत्रीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राहिले आहेत, मात्र, ते एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेल्याची चर्चा होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आषाढी वारीच्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात आले होते. या दौऱ्यातही राजू खरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले होते. तसेच, शिंदे यांच्या स्वागताची जाहिरातही त्यांनी दिली होती. त्यामुळे खरे हे पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जास्त रमत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.