

साक्री नगरपंचायतीत उपनगराध्यक्षांच्या नावाने बनावट राजीनामा तयार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
लेटरहेडचा गैरवापर करून बनावट स्वाक्षरीने राजीनामा मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला.
उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
sakri nagar panchayat complaint news : धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतींत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून उपनगराध्यक्ष हजर नसताना त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या लेटरहेडचा गैरवापर त्यांच्याच राजीनाम्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तर या प्रकारानंतर उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले यांनी थेट जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे तक्रार केली आहे. ज्यानंतर नगरपंचायतीच्या 'रामभरोसे' कारभाराचा अजब प्रकाराची जिल्हाभर चर्चा होताना दिसत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले साक्री शहरात उपस्थित नसताना त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला. त्यांच्या बनावट स्वाक्षरीने राजीनामा तयार करून तो नगराध्यक्षांकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. तर तो नगराध्यक्षांनी मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी अतिशय गोपनीय पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. यानंतर पुढील उपनगराध्यक्ष निवडीसाठी बैठकीचा अजेंडा ठेवण्यात आला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर उपनगराध्यक्षा उज्ज्वला भोसले यांनी पत्रक काढत याबाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत उपनगराध्यक्षा भोसले यांनी माहिती देताना म्हटलं आहे की, त्यांच्या पतीची तब्येत अचानक विघडल्याने त्या पुण्यात होत्या. २९ मार्चला पुण्याच्या डॉ. राजेश पारसनीस यांच्या हॉस्पिटलमध्ये पतीवर उपचार सुरू होते. याचदरम्यान त्यांच्याच कोऱ्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आला. त्यांच्या खोटी स्वाक्षरीने बनावट राजीनामापत्र तयार करण्यात आले. ते आधी नगराध्यक्षांकडे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.
हा प्रकार एका काट कारस्थानाचा भाग असल्याचे आरोप उज्ज्वला भोसले यांनी केला आहे. तसेच १ एप्रिलचा तथाकथित राजीनामा एवढा गोपनीय पद्धतीने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्या मागचे गौडबंगाल काय? याचा सोक्षमोक्ष घेतल्यानंतर या प्रकारात तालुक्यातील एका तथाकथित युवा पुढाऱ्याचे नाव समोर आले आहे. तर हा प्रकार आमदारांच्या आशीर्वादाने झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
तसेच आपण २९ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत पतीच्या वैद्यकीय कारणात्सव पुण्यात असताना अशा पद्धतीने खोटे दस्तऐवज तयार करण्याचे कारण काय? असाही सवाल आता त्यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सर्व माहिती दिली असून गरज पडल्यास पुणे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही उपलब्ध करून देणार असल्याचे उज्ज्वला भोसले यांनी म्हटले आहे.
तर या बोगस राजीनामा प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्काळ होऊ घातलेल्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी आयोजित बैठकीचा अजेंडाही थांबवावा. आणि न्याय द्यावा अशी अशी मागणी केली आहे. तसेच योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ असाही इशारा त्यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिला आहे.
1. साक्री प्रकरणात काय घडले?
उपनगराध्यक्षांच्या नावाने बनावट राजीनामा तयार करून तो पुढे पाठवण्यात आल्याचा आरोप आहे.
2. कोणावर आरोप करण्यात आला आहे?
नगरपंचायतीच्या कारभारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर हा आरोप आहे.
3. प्रकरण उघड कसे झाले?
उपनगराध्यक्ष निवडीच्या बैठकीचा अजेंडा समोर आल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.
4. तक्रार कुणाकडे करण्यात आली आहे?
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
5. पुढील कारवाई काय होऊ शकते?
चौकशीअंती दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.