

Thackeray Camp vs Shinde Camp : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे २३ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. यामुळे सध्या जळगावात राजकारण तापले आहे. यावरून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांच्या भाषणाला लोक आता कंटाळले असल्याचा टोला पाटील यांनी ठाकरे यांना लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन शिवसेनेने आपल्या मूळ हिंदुत्वाच्या विचारांना बगल दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंसह इतर आमदारांनी केला. हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी विरोधी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी जवळीक साधली. त्यामुळे बाळासाहेंबाच्या विचारांसाठी आम्ही बंड केले. तसेच हिंदुत्ववादी असलेल्या भाजपशी हातमिळविणी केल्याचा दावा शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.
ठाकरे आणि शिंदे यांच्यातील बेबनावानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुरुवातीस 'गद्दार' असे संबोधले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यांना '४० चोर' असे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री शिंदे वारंवार बाळासाहेबांच्या विचारांना जागल्याचा दावा करतात, त्यावरही ठाकरेंनी प्रत्येक ठिकाणी केलेल्या भाषणात निशाणा साधला.
यावर उद्धव ठाकरे म्हणतात, "पक्ष चोरला, चिन्ह चोरले; पण बाप कोण चोरतो का? त्यांनी माझा बापही चोरला. काय वाटत असेल त्यांच्या वडिलांना जे दुसऱ्याचे बाप चोरतात. बाळासाहेबांचे नाव न घेता राज्यात राजकारण करून दाखवा. बाळासाहेबांचे नाव न घेता निवडणूक लढवा."
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वारंवार होणाऱ्या उल्लेखाने शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपनेही टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, "उद्धवजींचा शब्दसाठा संपलेला आहे. त्यामुळे ते तेचतेच शब्द फिरवून बोलतात."
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी एकच भाषण करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही. त्यांनी प्रत्येक ठिकाणी 'रेकॉर्डींग' एकवावे." या पार्श्वभूमीवर आज जळगावातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.
आमदार किशोर पाटील (Kishor Patil) म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या भाषणांचा, वक्तव्यांचा लोकांना आता कंटाळा आला आहे. प्रत्येक ठिकाणी तेचतेच बोलतात. ज्यांना आपला बाप सांभाळता आला नाही, ते इतर गोष्टी काय सांभाळतील. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे टाळलेलेच बरे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.