
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत मोठा धक्कादायक निकाला लागला. विशेषतः काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांना काहीतरी गडबड झाली असल्याची शंका आहे. याकरिता विदर्भातील एकूण 27 पराभूत उमेदवार यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पराभूत उमेदवारालाही निवडणूक निकालावर विश्वास नाही. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेसचे आमदार साजीद पठाण यांना नोटीस बजावली आहे.
साजिद खान (Sajid Khan) पठाण गैरमार्गाने निवडून आल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका भाजपचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. न्यायालयाने पठाण यांना नोटीस बजावत चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. विदर्भातील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. यात मुख्यत्वे आघाडीच्या तसेच भाजपविरुद्ध लढलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, काँग्रेसच्या विजयी उमेदवाराविरुद्ध केवळ एकच याचिका झाली आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे (BJP) अधिकृत उमेदवार भाजपचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार साजीद पठाण यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. या नोटीसमुळे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. अग्रवाल यांच्याकडून ॲड. रोहन मालविय व ॲड. हरीष ठाकूर यांनी बाजू मांडली.
न्यायालयात 27 याचिका
नागपूर खंडपीठात विदर्भातील एकूण 27 पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केल्या आहेत. यात, ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर 17 दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असे आरोप करण्यात आलेत. याचिक दाखल करणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचाही समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.