

Sangali News: सांगली जिल्हा परिषदेमध्ये सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सभापती पदावर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची नेतेमंडळींच्याकडे फिल्डिंग सुरू आहे.
जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी सोबत महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्याचे फळ सदस्यांना मिळणार का याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत गैरहजर राहिलेल्या शिवसेनेच्या जयदीप भोसले, पृथ्वीराज पाटील यांच्यापैकी एकाला सभापती पद देण्याच्या हालचाली महाविकास आघाडीच्या गोठात सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी बुधवारी १ एप्रिल रोजी होणार आहेत. पीठासीन अधिकारी तथा मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी याबाबत नोटीस काढली. त्यामुळे सभापती निवडीसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान होणार आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोबत घेत सत्ता स्थापन केली. या सर्वांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे भाजपचे 'ऑपरेशन लोटस' अपयशी ठरले. त्यानंतर सभापती निवडीकडे लक्ष लागले आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सभापतिपदासाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याचे काम इच्छुकांनी सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य, बांधकाम, अर्थ, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन असे विभाग व समित्या आहेत. चार सभापतींची निवड केली जाणार आहे.
सदस्यांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने जो फॉर्म्युला वापरला, तोच सभापती निवडीतही असण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेनुसार सभापतिपदाचे वाटप होण्याची शक्यता आहे. तर भाजप सभापती निवडीत कोणते पाऊल उचलणार, याकडे लक्ष आहे. त्यामुळे सदस्य नाराज होणार नाहीत, याची काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.