Praniti Shinde-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : सोलापुरात काँग्रेसचे बेरजेचे राजकारण; इच्छुक वाढवणार भाजपची डोकेदुखी

Loksabha Election 2024 : सोलापूरच्या जनतेबरोबच विरोधक असलेल्या काँग्रेसलाही भाजप उमेदवाराची उत्सुकता आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ पाहणारी इंडिया आघाडी सक्षमपणे उभे राहण्याच्या आधीच कोसळली. त्यामुळे अनेक मतदारसंघात थेट काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होण्याची शक्यता आहे. सोलापुरातही या दोन पक्षांतच लढाई असून काँग्रेसने आपला उमेदवार निश्चित केला आहे. त्यासाठी सोलापूरची काँग्रेस कामाला लागली आहे. मात्र, भाजप अजूनही आपले पत्ते ओपन करायला तयार नाही, त्यामुळे सोलापूरच्या जनतेबरोबच विरोधक असलेल्या काँग्रेसलाही भाजप उमेदवाराची उत्सुकता आहे. (In Solapur Constituency, Congress started working for Lok Sabha elections)

सोलापूर लोकसभा मतदारसंघात शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा समावेश होतो. या सहापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. उर्वरीत दोन मतदासंघापैकी शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने हे आमदार आहेत. त्यामुळे कागदावर हा मतदारसंघ भाजपसाठी सोयीचा वाटतो. पण, सद्यस्थिती गेल्या पंचवार्षिकसारखी एकतर्फी नक्कीच नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होणार हे मात्र नक्की.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने सोलापूर लोकसभेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. तो उमेदवार शिंदे कुटुंबातील एक असणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातूनच त्यांनी कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले आहे. पण पक्षश्रेष्ठींनी आग्रह धरला तर शिंदे यांना नकार देणे सोपे असणार नाही. त्यामुळे सध्या तरी प्रणिती शिंदे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत असले तरी ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे रिंगणात दिसल्यास नवल वाटायला नको.

प्रणिती शिंदे या लोकसभेला निवडून आल्या तर त्यांच्या रिक्त होणाऱ्या शहर मध्य मतदारसंघात आपल्याला संधी मिळावी, यासाठी सर्वच इच्छुक जीव तोडून मेहनत करू शकतात. ही एक शक्कल काँग्रेस नेत्यांची असू शकते. पण काहीही असू सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित करून प्रचाराचा एकफेरी शिंदे यांनी पूर्ण केल्याचे मानले जात आहे.

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीपासून शिंदे यांनी सुरुवात केली. त्यानंतर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, देगाव येथील गणेश वानकर यांच्या फार्म हाऊसवर हुरडा पार्टीच्या माध्यमातून काँग्रेसचे बेरजेचे राजकारण केले आहे. अनेक दुरावेलले नेते या हुरडा पार्टीच्या माध्यमातून जोडले आहेत. गेली काही वर्षे दुरावलेले दिलीप मानेही शिंदेबरोबर एकत्र आले, त्यामुळे शिंदे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. काँग्रेसपासून दुरावलेल्या नेत्यांना जोडताना महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते दुखवणार नाहीत, याची काळजीही शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे सोलापुरात सध्या तरी भाजपपेक्षा काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून येते.

दुसरीकडे, भाजपच्या गोटात मात्र शांतता आहे. तसेही, उमेदवार ठरवताना भाजपच्या स्थानिक नेत्यांना किती विचारले जाते, हा कळीचा मुद्दा आहे. हायकमांडने दिलेले उमेदवार स्वीकारण्याशिवाय भाजपच्या स्थानिक नेत्यांना सध्या तरी पर्याय नाही. त्यामुळे आज भाजपच्या कितीही नेत्यांची उमेदवारीसाठी चर्चा होत असली तर उमेदवार कोण असणार हे हायकमांडच ठरवणार आहे. भाजपकडून सोलापूरसाठी सध्या माजी खासदार अमर साबळे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, त्यांच्या कन्या कोमल ढोबळे, निवृत्त अधिकारी भारत वाघमारे, मोहोळचे संजय क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर यांची इतर नावे चर्चेत आहेत.

या सर्वांत आमदार सातपुते हे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांच्या अधिक जवळचे आहे. त्यानंतरही भाजप हायकमांड त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करेल, याची शाश्वती नाही. पण ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमधील सर्वांत वरचे नाव आहे. त्यामुळे सोलापुरात सातपुते लढायला उतरले तर आश्चर्य वाटणार नाही.

या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार अधिक असले तरी गेल्या पंचवार्षिकची परिस्थिती सध्या नाही. शेतीचे प्रश्न, बाजारभाव, सोलापूर शहराचा पाणीप्रश्न, विमानसेवा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हे काही ज्वलंत विषय थेट मतदानावर परिणाम करू शकतात. विशेष म्हणजे ते सध्या भाजपच्या विरोधातील आहेत, त्यामुळे सोलापूर याखेपेला भाजपला तितकेसे सोपे नाही, हे मात्र खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT