
Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी कोल्हापूर ते मुंबई आशा दररोज वाऱ्या करून प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पायघड्या घालणारे माजी आमदार के पी पाटील हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. के पी पाटील हे शिवबंधन तोडण्याच्या तयारीत आहेत. त्याबाबतचे संकेत गोकुळचे संचालक रणजीत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित लावून दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीकता वाढल्याचे देखील बोलले जात आहे. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची कोंडी निर्माण झाल्याने त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले होते. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पहिली सभा के पी पाटील यांच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात घेतली होती. मात्र तेच के पी पाटील आता ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत माजी आमदार के पी पाटील हे निवडणुकीच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले होते. तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची कोंडी निर्माण झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सोबत घरोबा केला होता. राधानगरी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाईल अशी शक्यता होती. हेच गृहीत धरून के पी पाटील यांनी काँग्रेस प्रवेशाची देखील तयारी केली होती. मात्र ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्याने माजी आमदार के पी पाटील यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले होते.
त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र या लढतीत माजी आमदार के पी पाटील यांचा पराभव झाला. दरम्यान या निवडणुकीत त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक रणजीत पाटील हे देखील के पी पाटील यांच्या प्रचारात होते.
दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राष्ट्रवादीच्या सरकारी समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविकास आघाडीत असलेले गोकुळचे संचालक रणजीत पाटील यांची स्टेजवर उपस्थित दिसून आली. त्यांची उपस्थिती दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान वडील माजी आमदार के पी पाटील हे देखील महायुतीमधील राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक लागली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत के पी पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता त्यांनी या शब्दापासून यूटर्न घेतला. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी कधीच सोडणार नाही असा दावा केला होता. त्या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मात्र त्यांनी मागे न पाहता महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र पुन्हा एकदा आता तेच के पी पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत अशी माहिती आहे.
माजी आमदार के पी पाटील यांची बिद्री सहकारी साखर कारखान्यावर सत्ता आहे. शैक्षणिक संस्था देखील आहेत. अशावेळी सरकारच्या विरोधात राहुन राजकीय दृष्ट्या नरपरवडणारे आहे. शिवाय त्यांचेच विरोधक सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आहेत. त्यामुळे भविष्य काळातील कारखान्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांना सत्तेचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत पुन्हा घर वापसी करायचे ठरवले आहे की काय? अशी चर्चा आता जोरात सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.