
Mumbai Political News : भाजपने देशभरातील 36 राज्य युनिटपैकी 29 राज्यातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवड करण्यासाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. तर दुसरीकडे महत्त्वाच्या 7 राज्यांमधील प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडी रखडल्या आहेत.
ओडिशा युनिटने 7 जुलैला मनमोहन समल यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. मात्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या सात राज्यांमध्ये अद्याप नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तांत्रिकदृष्ट्या कोरम पूर्ण असला तरी उर्वरित राज्यांमध्ये सुरु असलेली अनिश्चितता ही अंतर्गत गटबाजी, नेतृत्वातील द्वंद्व आणि रणनीतीतील गोंधळाचे प्रतीक आहे. भाजपच्या संविधानानुसार 50 टक्के राज्यांमध्ये निवड झालेली असावी लागते. वरिष्ठ नेतृत्वाला या प्रक्रियेबाबत एकमत हवे असून सर्व राज्यांमध्ये निवडणूक पूर्ण करूनच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करायची आहे.
भाजपने पंजाब, झारखंड, दिल्ली आणि मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली आहे. झारखंड आणि दिल्लीमध्ये जिल्हाध्यक्षांची निवडणूक पूर्ण झाली असून लवकरच प्रक्रियेची अधिकृत घोषणा करून प्रदेशाध्यक्ष निवडता येऊ शकतो. पंजाबमध्ये मात्र कोरम नसल्यामुळे पक्षाने कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती केली आहे.
गृहमंत्री अमित शहा 9 व 10 जुलै रोजी रांचीमध्ये ईस्टर्न झोनल कौन्सिलच्या बैठकीसाठी जात आहेत. त्याचवेळी ते झारखंड भाजपच्या (BJP) मुख्य गटाशी बैठक घेणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पक्षाचे नेते स्थानिक नेत्यांशी चर्चा करून अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कर्नाटकमध्ये, 2024 लोकसभा निवडणुकीतील अपयश आणि 2023 विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभर झाले असले तरी नेतृत्वाचा प्रश्न सुटलेला नाही. राज्यातील भाजपमध्ये लिंगायत गटाचे नेते बी. एस. येडियुरप्पा आणि त्यांचे विरोधक असे दोन गट आहेत.
येडियुरप्पांचे सुपुत्र आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आहे. मात्र भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष हे त्यांच्या विरोधकांना एकत्र करत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्माई यांच्यासह काही नेते विजयेंद्र यांच्या विरोधात आहेत.
येडियुरप्पा नंतरचा पर्याय ठरवता न आल्यामुळे, आगामी बेंगळुरु महापालिका निवडणुका आणि लोकसभा जागांवरील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्ष निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे. येडियुरप्पा आणि विजयेंद्र हे लिंगायत समाजाच्या एकत्रीकरणासाठी महत्त्वाचे असल्याने त्यांना पर्याय नसल्याचे मानले जात आहे.
गुजरातमध्ये, भाजप गेली तीन दशके सत्तेत असला तरी विलंबाचे कारण प्रक्रियात्मक नाही, तर अंतर्गत संघर्ष आहे. सी. आर. पाटील यांचा कार्यकाळ संपत आला आहे तरीही त्यांचा पक्षसंघटनांवर प्रभाव कायम आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या गटासोबत पाटील समर्थक आणि स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. पाटीदार वर्चस्व आणि वाढत्या ओबीसी आकांक्षा यामध्ये समतोल साधणे हेही आव्हान आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने येथे थोडीफार घुसखोरी केलेली आहे.
उत्तर प्रदेश हा भाजपचा सर्वात महत्त्वाचा गड असून येथील परिस्थिती अधिकच नाजूक आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची वाढती प्रतिमा आणि प्रशासनावरील पकड पाहता केंद्रीय नेतृत्व कोणताही निर्णय घेताना सावध आहे.
योगींना जवळचा उमेदवार दिल्यास दिल्लीत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे, आणि शीर्षस्थानी लादलेला अध्यक्ष लखनऊमध्ये स्वीकारला जाण्याची शक्यता कमी आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत पूर्व उत्तर प्रदेश आणि अयोध्येतील कामगिरीने पक्षात अंतर्मुखता निर्माण केली आहे. सरकार आणि संघटनेतील विसंवादही स्पष्ट झाला असून या संतुलनावर निर्णय घेण्यास उशीर होतो आहे.
हरियाणामध्ये, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या प्रभावाखाली भाजप अजूनही कार्यरत आहे. खट्टर दिल्लीला गेल्यावर पक्षात गटबाजी सुरू झाली आहे. केंद्रीय नेतृत्व अद्याप ठरवू शकलेले नाही की खट्टर यांच्या वारसाला पुढे घेऊन जायचे की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची, याचा विचार करीत आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री राव इंदरजीत सिंह यांनी 11 भाजप आमदार आणि काँग्रेसच्या आमदार मंजू चौधरीला आपल्या मुलीच्या घरी जेवणासाठी बोलावून ताकद दाखवली. सिंह हे दक्षिण हरियाणा आणि राजस्थान सीमाभागात प्रभावशाली आहेत पण त्यांच्या वयाचा अडसर येत आहे. सध्याचे अध्यक्ष मोहनलाल बडोली हे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचे निकटवर्तीय असून खट्टर गटाशी संबंधित आहेत. त्यामुळे निर्णय लांबणीवर गेला आहे.
पंजाबमध्ये, संघटनात्मक मतभेद दिसत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष नियुक्त झालेले नाहीत. सध्याचे अध्यक्ष सुनील जाखड काँग्रेसमधून आले असून, त्यांनी भाजपमध्येही काँग्रेससारखेच वर्तन केल्याने नाराजी आहे. संघटनेचे कार्य समजून घेतल्याशिवाय त्यांनी पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका केली जात आहे.
जूनमध्ये विजय रुपानी यांचे विमान अपघातात निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. 7 जुलैला भाजपने जुने नेते अश्वनी शर्मा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. ते आता संघटन सरचिटणीस मंत्री श्रीनिवास यांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या गतिमान करणार आहेत.
पंजाबमध्ये भाजप पक्ष दिशाहीन दिसत आहे, कार्यकर्ते निराश आहेत आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुनरुज्जीवनासाठी स्पष्ट आराखडा नाही. अश्वनी शर्मा यांच्यावर पक्षाचा गती निर्माण करण्याचा भार आहे. दिल्लीमध्ये, भाजपने 2024 मध्ये सातही लोकसभा जागा जिंकल्या आणि आम आदमी पक्षाला विधानसभा निवडणुकीत हरवले तरी अध्यक्षपदाबाबत निर्णय लांबणीवर आहे.
जिल्हाध्यक्षांची निवड झाली असून कार्यकर्त्यांचा उत्साह चांगला आहे. मात्र, विद्यमान अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांना कायम ठेवायचे की नवीन दमदार चेहरा आणायचा, याबाबत चर्चा सुरू आहे. ‘ट्रिपल इंजिन’ सरकार असताना, दिल्ली युनिटचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. पण सचदेव यांना लवकर हटवले तर अंतर्गत नाराजी निर्माण होऊ शकते.
झारखंडमध्ये, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही जातीय समीकरण जुळवण्यात पक्ष अडखळतो आहे. आदिवासी नेत्याला पुढे करायचे की ओबीसी आधार मजबूत करायचा यावर पक्षात मतभेद आहेत. बाबूलाल मरांडी प्रभावी असले तरी त्यांचा काळ संपल्याचे काहींना वाटते. आदिवासी-ओबीसी नेतृत्वाच्या संघर्षामुळे निर्णय घेण्यात उशीर होतो आहे.
मणिपूरमध्ये, राजकीय हालचाल पूर्णपणे थांबली आहे. मेतेई आणि कुकी समुदायातील संघर्षामुळे संघटनात्मक फेरबदल शक्य नाही. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना स्वतःच्या आमदारांचा पाठिंबा नाही आणि त्यांनी दोन्ही समुदायांमध्ये विश्वास गमावला आहे. सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे कोणतेही बदल पक्ष टाळतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.