Mumbai News : वीस वर्षापूर्वी दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत. नुकत्याच घेतलेल्या विजयी मेळाव्यास मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा सर्व प्रतिसाद पाहता भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे आडाखे काही राजकीय धुरणींनी बांधले होते. मात्र, राज व उद्धव ठाकरेंनी या सर्वांचे अंदाज चुकवले आहेत.
राजकीय दृष्टया मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली, तर विखुरलेली मराठी मते एकवटणार आहेत. यामुळे ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद वाढणार आहे, विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागात दोन्ही पक्षांना मोठे यश मिळू शकते. त्यामुळे मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ पूर्णपणे बदलू शकते.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुका लवकरच होणार आहे. बीएमसी निवडणुकीची तयारी भाजपने केली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) गेल्या एकही दिवसापासून हा गड राखण्यासाठी जोरात तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि राज ठाकरे राजकीय दृष्ट्या दोघे जर एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या मूळ विचारसरणीवर चालत असून त्यांना ठाम मराठी मतदार आणि ठिकठिकाणी मुस्लीम-धर्मनिरपेक्ष मतदारांचा पाठिंबा आहे, विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकण भागात त्याना मानणारा मोठा मतदार आहे. राज ठाकरे यांचे वक्तृत्व शैली अजूनही अनेक मराठी युवकांना आकर्षित करते. मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरी भागात त्यांचे विशिष्ट मराठी मतदार वर्गावर प्रभाव आहे.
त्यामुळे भविष्यात ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर दोघांच्या मिळून असलेल्या मतांची आकडेवारी बघितली तर अनेक मतदारसंघात विशेषतः मुंबई आणि ठाण्यात त्यांच्या युतीमुळे भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गणित बिघडू शकते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप यांचं एकत्रित मत विभाजन होऊ शकते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार का? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल घडू शकतात. दोघेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोर देतात. जर हे दोघे एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये विखुरलेली मते एकवटली जाऊ शकतात. यामुळे शिवसेना आणि मनसेची एकत्रित ताकद वाढणार आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागात मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेल मोठे यश मिळू शकते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम दिसणार आहे. सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची ठाकरे गटाशी स्पर्धा आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्यास, मराठी मतांचे विभाजन थांबणार आहे. दुसरीकडे मराठी मते ठाकरे बंधुंच्या पारड्यात पडली तर त्यांना सत्ता मिळवण्याची संधी मिळू शकते.
मुंबई व ठाणे या भागांमध्ये एकत्र आल्यास ठाकरे बंधूंचे मतप्रतिशत भाजपच्या तुलनेत अधिक होऊ शकते. पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर मध्येही त्यांनी एकत्रित लढल्यास मतांचे विभाजन न होता अधिक चांगली स्पर्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळेच या बदलेल्या आकड्यांचा धसका भाजपने घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तुलनेत काहीशी मागे पडली होती. मात्र त्यांनी इतर पक्षांना वरचढ होऊ दिलेले नाही. त्यामुळे आगामी कळत होत असलेली निवडणूक पाहता उद्धव ठाकरे यांची शिवसेना मोठे कमबॅक ठरु शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारसरणीला पुन्हा बळ मिळेल. तर दुसरीकडे त्याचा तोटा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला होणार आहे. मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखले जाऊ शकते, त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी मोठी संधी आहे.
भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र आले, तर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागणार आहे. राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली, तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते. असात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते.
येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले, तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूकडे आकर्षित होऊ शकतात. यामुळे शिंदे गटाची ताकद असलेल्या मुंबई उपनगर आणि ठाणे, कोकणात कमी होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपने मराठी मतांचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाशी युती केली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास, भाजपला मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे. यामुळे भाजपची ताकद देखील कमी होऊ शकते.
गेल्या काही दिवसापासू मनसेची घडी विस्कटलेली आहे. ती सावरण्याची संधी राज ठाकरेंच्या मनसेला मिळू शकते. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास मनसेला राजकीय वजन वाढण्याची संधी मिळणार. मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्याने त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने विरोधक प्रश्न उपस्थित करतात.
राज ठाकरे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी मुद्द्यावर बोलतात. या वैचारिक फरकांचा समन्वय साधणे आव्हानात्मक असणार आहे. मात्र राज आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, यावर दोन्ही पक्षांच्या भविष्यातील वाटचाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन बंधू काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप व एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडील निम्म्यापेक्षा अधिक माजी नगरसेवकला गळाला लावले आहेत. त्या जोरावरच भाजपकडे आता १०० माजी नगरसेवक आहेत तर एकनाथ शिंदे यांचा आकडा देखील लवकरच ५० माजी नगरसेवकाचा होणार आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही पक्षाने एकत्र येत निवडणूक लढवली तर आकडा बहुमताच्या पुढे जाऊ शकतो, असे चित्र होते. मात्र, ठाकरे बंधू एकत्र येण्याचा परिणाम महायुतीच्या या गणितावर होणार आहे.
येत्या काळात ठाकरे बंधु एकत्र आले, तर त्यांचा एकत्रित प्रभाव मराठी अस्मितेवर आधारित असणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. आकडेवारी आणि मतदारांची मानसिकता पाहता, ही मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ पूर्ण बदलू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.